बार्शी : शहराला भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिणामी, अनेक जलाशयांनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी अजित फाऊंडेशनच्या पुढाकारातून व आयएएचव्हीच्या सहकार्याने कोरफळे (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. गावोगावचे छोटे मोठे पाटबंधारे प्रकल्पही उन्हाळ्यामुळे कोरडे पडण्याची स्थिती असल्याने या प्रकल्पांतील गाळ काढून तो आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देण्याचे प्रयोजन आहे. त्या दृष्टिकोनातून कोरफळेतील अठ्ठावशी तलावाचे काम पूर्ण करुन पाचकवडे लवण तलावातील कामास प्रारंभ केला आहे. यामुळे शेतीसाठी सुपीक माती उपलब्ध होईल आणि तलावातील पाणीसाठवण क्षमताही वाढेल, ज्यामुळे कृषी उत्पादनाला चालना मिळणार आहे.
यावेळी अजित फाऊंडेशनचे महेश निंबाळकर, दादा नवले, मनीष राऊत, राजू बेडके, वैष्णवी नवले, शुभम डहारे, बाबा ठाकरे, रणजीत माने, कोरफळे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.सध्याच्या दुष्काळी स्थितीत गावपातळीवरील पाझर तलाव व जलसंधारण प्रकल्पांतील गाळ काढून देण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण गाव हद्दीतील व्यापक पाण्यासंबंधी कामांसाठी लोकसहभाग आवश्यक आहे. काढलेला गाळ शेतकऱ्यांनी नेल्यास त्यातून त्यांच्या जमिनीची सुपीकताही वाढणार आहे.असे अजित फाऊंडेशनचे संस्थापक महेश निंबाळकर यांनी सांगीतले.