जयपूर : राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला घरात
लपवून ठेवल्याबद्दल जयपूर येथून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. गोगामेडी हत्या प्रकरणातील
आरोपी नितीन फौजी याला महिला आणि तिच्या पतीने घरात लपवून ठेवले होते. राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नितीन फौजी २८ नोव्हेंबरलाच जयपूरला आला होता. यानंतर पूजा नावाच्या या महिलेने आणि तिच्या पतीने आरोपीला त्यांच्या घरामध्ये ठेवले. तसेच त्याला पैसे आणि शस्त्रे सुद्धा पुरवली.
पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून तिचा पती महेंद्र हा फरार आहे. महेंद्र हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर २४ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेच्या घरात एके-४७ बंदुकीचा फोटोही सापडला आहे. या महिलेचा पती महेंद्र मोठ्या प्रमाणात शस्त्रे घेऊन फरार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सुखदेव सिंग गोगामेडी हे राजपूत समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात होते. २०१७ मध्ये पद्मावत चित्रपटाच्या विरोधात झालेल्या आंदोलनात ते देशभर चर्चेत आले होते. जयपूरमध्ये पद्मावत चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राजपूत करणी सेनेने चित्रपटाच्या सेटवर तोडफोड करून निषेध केला होता. राजपूत करणी सेनेने चित्रपटातील अनेक दृश्यांवर आक्षेप घेतला होता.