जिंतूर : जिंतूर जालना महामार्गावरील अकोली येथील रस्त्यावर धोकादायक गतिरोधकावर मोटारसायकल आदळल्यामुळे पाठीमागे बसलेली महिला तोल जाऊन खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना दि.३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे.
जिंतूर जालना महामार्गावर अकोली येथील रस्त्यावर धोकादायक गतिरोधक बसवण्यात आले आहेत. यामुळे नेहमीच अपघात घडत आहेत. सावळी येथील पती पत्नी बेलखेडा येथे जात असताना दि. ३० रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अकोली येथील गतिरोधक लक्षात न आल्यामुळे दुचाकी आदळली. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या छाया जगन्नाथ वाघ वय ३० वर्ष रा. सावळी तोल जाऊन खाली पडल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमी महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. दीपा परिहार यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.