नाशिक : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलिस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. मात्र वर्दीतले रक्षकच भक्षक बनले तर लोकांनी कुणावर विश्वास ठेवायचा? नाशिकमध्ये तसाच एक संतापजनक प्रकार घडला आहे.
एका शिक्षिकेवर एका पोलिस कर्मचा-याने मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षक महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखविणा-या शहर पोलिस दलातील अमंलदाराने पीडितवेर बलात्कार केला. नंतर लग्नाला नकार दिल्यावर तरुणीने दुस-याशी विवाह केला असता, संशयित अंमलदाराने तिच्या पतीला अपघातात ठार करण्याची धमकी देत पुन्हा बलात्कार केला. अखेर नाशिक शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली. संशयित पोलिस अंमलदाराविरोधात बलात्कारासह धमकावल्याचा गुन्हा दाखल करीत संशयिताला अटक करण्यात आली आहे.
अभी ऊर्फ चंद्रकांत शंकर दळवी(३५) असे संशयित पोलिस अंमलदाराचे नाव आहे. तो म्हसरुळ येथे, केतकीनगर ला राहतो. पोलिस आयुक्तालयाकडून शनिवारी (दि.१७) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस दलाच्या प्रतिमेला अशोभनीय कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असून खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.