पुणे : प्रतिनिधी
पुण्यात महिला दिनी सर्वांदेखत शास्त्रीनगर चौकातील सिग्नलवर लघूशंका करणारा निर्लज्ज गौरव अहुजाविरोधात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. गौरव अहुजाच्या कुटुंबाच्या मालकीच्या बारमध्ये घुसून महिलांनी आंदोलन केले. महिलांना पोलिसांनी बारमधून बाहेर काढले आहे, तर बार कर्मचा-यांनी क्रीम किचन बार आंदोलनानंतर बंद केला आहे.
पुण्यात भररस्त्यात निर्लज्ज कृत्य करणा-या बड्या बापाच्या पोराला पोलिसांनी अटक केली आहे. महागड्या कारमध्ये दारुची बाटली घेऊन बसलेला त्याचा मित्र भाग्येश निपजिया देखील पोलिसांच्या तावडीत आला असल्याची माहिती आहे. गौरव अहुजाच्या निर्लज्ज कृत्यानंतर काँग्रेसची महिला आघाडी त्याच्याविरोधात आक्रमक झाली.
महिला आंदोलकांनी गौरव अहुजा आणि त्याचे वडील मनोज अहुजा यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळेच त्यांच्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही का, असा सवाल उपस्थित केला.
काँग्रेसच्या संगीता तिवारी यांनी गौरव अहुजाच्या कुटुंबाच्या मालिकीचे हॉटेल झ्र बार बाहेर आंदोलन केले. महिलांचे आंदोलन सुरु असताना अहुजाच्या मालकीचा क्रीम अँड किचन बार सुरु होता, आंदोलक महिला या बारमध्ये घुसल्या तेव्हा बारमध्ये असलेले ग्राहक आणि कर्मचारी पळून गेले. आक्रमक महिलांना पोलिसांनी बाहेर काढले.