धाराशिव : महिला शक्तीने देशातील हुकुमशहा संपवावा असे आवाहन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केले आहे. धाराशिव इथे एका सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी महिला दिनानिमित्त समस्त महिला वर्गाने भारतमातेचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावेत असे आवाहनही त्यांनी केले.
उद्धव ठाकरे म्हणाले महिलांना शुभेच्छा देताना मी काय बोलावं हे कळत नाही. कारण कोणत्या देशात आपण राहतो इथली राजवट कशी आहे. महाराष्ट्रात काय सुरु आहे. मेरा परिवार असे मोदींनी जाहीर केले. मग मणिपूरच्या महिला यात येत नाहीत का? तसेच आंदोलन करणा-या महिला कुस्तीपटू यामध्ये येत नाहीत का? अशी महिलांची हालत बघितल्यानंतर त्यांना शुभेच्छा तरी कशा देऊ. धाराशिवमध्ये येऊन काल मी तुळजाभवानीचे दर्शन घेतले त्या तुळजाभवानीचे तुम्ही रुप आहात. तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. कारण ज्या ज्या वेळेला आसूर माजले त्यावेळी जगदंबेनं अवतार घेतले होते म्हणून आपण तिला महिषासूर मर्दिनी म्हणतो.
म्हणून मी तमाम महिला शक्तीला आवाहन करतो की तुम्ही आता महिषासूरमर्दिनी बना आणि देशात जो हुकुमशहा माजू पाहतोय त्याचे मर्दन करुन पुन्हा एकदा भारत मातेचे रक्षण करण्यासाठी देशातील सर्व महिलांना आम्ही विनंती करतो, वंदन करतो आणि पुढच्या लढाईच्या यशासाठी आशीर्वाद मागतो. ही लढाई मोठी आहे कुठेही फसू नका? अडकू नका. विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय स्वस्थ बसू नका, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.