17.1 C
Latur
Friday, January 23, 2026
Homeमहाराष्ट्र१५ महापालिकांमध्ये महिलाराज

१५ महापालिकांमध्ये महिलाराज

मुंबई, पुण्यात महिलाच कारभारी, २९ मनपांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर मुंबईच्या आरक्षणावरून वाद ठाकरे गटाचा फिक्सिंगचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील २९ पैकी निम्म्याहून अधिक म्हणजे १५ महापालिकांच्या महापौरपदावर महिला विराजमान होणार आहेत. मुंबईसह नवी मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसह नांदेड या राजकीयदृष्टया महत्वाच्या महापालिकांच्या कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती येणार आहेत. जालना आणि लातूरचे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे तर मुंबई, नागपूर, पुणे, नवी मुंबईसह ९ मनपांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्ग, ८ महापालिकांत ओबीसी प्रवर्गाचे महापौर होणार असून अकोला, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि जळगाव ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. तसेच १७ महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महापौर होणार असून, यापैकी ९ महापालिकांमध्ये महिलांना महापौर पदावर संधी मिळणार आहे.

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयातील परिषद सभागृहात २९ महानगरपालिकांमधील महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. महापौर पदाच्या पहिल्या अडीच वर्षासाठी काढण्यात आलेल्या या सोडतीत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २९ पैकी १ पद आरक्षित झाले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ३ पदे आरक्षित झाली असून, त्यापैकी २ पदे अनुसूचित जातीमधील महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी ८ पदे आरक्षित झालेली असून, त्यापैकी ४ पदे या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाली आहेत. उर्वरित १७ महानगरपालिकांमधून सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी ९ पदे येत असून बाकीची ८ महापौर पदे खुली म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत.

दरम्यान, मुंबईचे महापौरपद रोस्टर प्रमाणे ओबीसी अनुसूचित जमाती महिलेकडे जाणे अपेक्षित असताना नियमबा पद्धतीने आरक्षण काढले गेल्याचा आक्षेप ठाकरे गटाने घेतला आहे. सत्ताधारी पक्षाने स्वत:चे बहुमत लक्षात घेऊन लॉटरी काढल्याचा आरोप ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी केला तर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने आणि नियम पाळूनच पार पाडण्यात आली आहे. ठाकरे गटाला जे हवे होते ते न झाल्याने त्यांनी आरडाओरड केल्याचे स्पष्ट केले.

म्हणून मुंबईत अनुसूचित जमातीचे आरक्षण नाही
नगरविकास विभागाच्या २००६ च्या नियमानुसार अनुसूचित जमातीसाठी संबंधित महापालिकेत किमान तीन प्रभाग हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असले पाहिजेत. मुंबई, महापालिकेत अनुसूचित जमातीसाठी फक्त दोन प्रभाग आरक्षित आहेत. त्यामुळे मुंबईचे महापौर पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होत नाही अशी माहिती यावेळी देण्यात आली.

महापौर पदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
महापौर पदाचे आरक्षण निश्चित झाल्याने या पदासाठी आता इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मुंबईचे महापौर पद भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याने भाजपमध्ये अनेक महिला इच्छुक आहेत. भाजपच्या महापौर पदाचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्तरावर होणार असल्याचे समजते तर ठाणे कल्याण-डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महापौर पदाचे उमेदवार निश्चित करणार आहेत.

आरक्षण पुढीलप्रमाणे….
महापौर पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण आणि महापालिका
-अनुसूचित जमाती : कल्याण-डोंबिवली
-अनुसचित जाती : ठाणे
-अनुसूचित जाती महिला : जालना आणि लातूर
-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : जळगाव, चंद्रपूर, अहिल्यानगर, अकोला
-नागरिकांचा मागास प्रवर्ग : पनवेल, इचलकरंजी, कोल्हापूर, उल्हासनगर
-सर्वसाधारण महिला : पुणे, धुळे, बृहन्मुंबई, नवी मुंबई, नांदेड-वाघाळा, मालेगाव, मिरा- भाईंदर, नागपूर, नाशिक.
-सर्वसाधारण : छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली-मिरज-कुपवाड, अमरावती, वसई-विरार, सोलापूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी-निजामपूर.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR