ताडकळस : आपल्याला प्रत्येक क्षेत्रात अद्यावत होणे गरजेचे आहे. सोबतच विकसित राष्ट्र निर्माणासाठी शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा देखील अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे शिक्षकांनी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणातून स्वत:ला विकसित करून मुलांना घडविण्यासाठी हातभार लावावा असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षण अधिकारी गणेश शिंदे यांनी पूर्णा येथील संस्कृती महाविद्यालयातील प्रशिक्षण स्थळाला भेट दिली असता केले.
संपूर्ण राज्यभर अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण पहिला टप्पा प्रत्येक तालुकास्तरावर दि.१२ डिसेंबर पासून राबविला जात आहे. आज प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी शिक्षणाधिकारी यांनी प्रशिक्षण स्थळास भेट दिली असता शिक्षकांशी संवाद साधला व प्रशिक्षणाविषयी समाधान व्यक्त केले.
शिक्षणाधिकारी पुढे म्हणाले की, काळानुरूप आधुनिक बदल स्वीकारून विद्यार्थी विकास साधण्याचे शिक्षण हे प्रमुख साधन आहे. समाज रसातळाला जात असेल तर समाजाला फक्त शिक्षकच वाचवू शकतो. यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असून सकारात्मक पद्धतीने भविष्यवेधी शिक्षणाच्या माध्यमातून बदल घडवून आणावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी प्रशिक्षणार्थी म्हणून तालुक्यातील १५० शिक्षक उपस्थित होते. सुलभक म्हणून रवींद्र हनुमंते, वेंकटरमन जाधव, अनिल ढाले,आनंद जाधव, संतोष रत्नपारखे, केशव पाटील, मारुती कदम, श्रीमती सारिका गिरी, श्रीमती प्रतिमा मसारे व श्रीमती राधा भिसे हे काम पाहत आहेत. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी सूर्यवंशी, गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी मेहनत घेत आहेत.