27 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeअंतरराष्ट्रीयजग महायुद्धाच्या उंबरठ्यावर; सर्वाधिक फटका रशिया, अमेरिकेला बसणार!

जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर; सर्वाधिक फटका रशिया, अमेरिकेला बसणार!

अंदाजित एकूण नुकसान १७,६३,००० लाख कोटी रुपये होणार

येरुसलेम : वृत्तसंस्था
गेल्या वर्षभरापासून हमाससोबत संघर्ष सुरू असतानाच गेल्या काही दिवसांत इस्रायलने इराणचे पाठबळ असलेल्या लेबनॉनमधील हिजबुल्लाह या संघटनेला लक्ष्य करून अनेक बड्या नेत्यांचा खात्मा केला. इस्रायलच्या या कारवाईमुळे इराणचा तीळपापड झाला असून मध्यपूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग उभे असून युद्धाला तोंड फुटले तर अंदाजित एकूण नुकसान १७,६३,००० लाख कोटी रुपये होण्याची चिन्हे आहेत.

रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास, इस्रायल-इराण, लेबनॉन आणि सीरिया हे देश कोणत्या ना कोणत्या स्वरूपात युद्धात आहेत. याशिवाय, जगातील ४० हून अधिक इस्लामिक देश इस्रायलच्या विरोधात एकत्र येत असून रशियाही बाहेरून पाठिंबा देत आहे. दुसरीकडे, अमेरिकेसह नाटो समूहातील देश इस्रायलच्या पाठीशी उभे आहेत. उत्तर कोरिया सतत युद्धाची धमकी देत ​अणुचाचणी करत आहे.

अशातच भारत आणि चीन यांच्यातही सीमा संघर्ष पाहायला मिळतो. तसेच, चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. पण, तैवान अमेरिकेला कोणत्याही किंमतीवर वाचवायचे आहे. जगातील एकूणच अशी परिस्थिती पाहता पुन्हा एकदा महायुद्धाकडे वाटचाल होत आहे का? असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो.

जागतिक स्तरावर परिस्थिती बिघडली आणि तिस-या महायुद्धाला तोंड फुटले तर जगात किती रुपयांचे नुकसान होणार आणि त्याचा सर्वाधिक फटका कोणत्या देशाला सहन करावा लागेल. याचा अचूक अंदाज लावणे शक्य नाही, परंतु विश्लेषक दुस-या महायुद्धात झालेल्या नुकसानीच्या आधारे भविष्यातील नुकसानीचा अंदाज लावत आहेत. १९३९ ते १९४५ या काळात झालेल्या दुस-या महायुद्धाचे इतिहासकार डॉ. हेलन फ्राय यांच्या मते, त्या काळातील आर्थिक नुकसानाचा आजच्या दृष्टीने अंदाज केला तर जवळपास २१ ट्रिलियन डॉलर्सचे (जवळपास १७६४ लाख कोटी रुपये) नुकसान झाले. मात्र, तिस-या महायुद्धात यापेक्षा १००० पट अधिक नुकसान होण्याचा अंदाज आहे. हा आकडा बघितला तर एकूण नुकसान जवळपास १७,६३,००० लाख कोटी रुपये इतके असू शकते.

आधुनिक शस्त्रे विकसित : सध्या अनेक देशांकडे आधुनिक शस्त्रे आहेत. युद्ध झाले तर ते जमीन, पाणी आणि आकाश तसेच सायबरच्या माध्यमातून लढले जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जीवितहानीबरोबरच मोठी वित्तहानी होण्याचीही शक्यता आहे. दुस-या महायुद्धात जिथे फक्त अमेरिकेकडे अणुशक्ती होती, आज जगातील डझनभर देशांकडे अणुबॉम्ब आहेत. एवढेच नाही तर हायड्रोजन बॉम्ब आणि रासायनिक शस्त्रेही विकसित केली आहेत.

कोणाचे होणार जास्त नुकसान?
दुस-या महायुद्धात युरोपीय देशांना सर्वाधिक फटका सहन करावा लागला. तिसरे महायुद्ध झाले तर त्याचा सर्वाधिक परिणाम अमेरिका आणि रशियावर होणार हे उघड आहे. या दोन देशांनी इतर देशांना एकमेकांच्या विरोधात एकत्र उभे केले आहे. युद्ध झाल्यास या दोन्ही देशांना केवळ आर्थिक मदतच करावी लागणार नाही, तर मित्र राष्ट्रांना शस्त्रेही द्यावी लागतील. युक्रेन-रशिया युद्धात अमेरिकेने युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची थेट मदत तर दिलीच, पण अनेक शस्त्रेही पाठवली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR