नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पूर्व आफ्रिकेतील बुरुंडी देशाने गत फेब्रुवारी महिन्यात जारी केलेली १० हजार फ्रँकची जगातील सर्वांत मोठी बँक नोट भारतात दाखल झाली आहे. नाणी व चलनातील नोटांचा संचय करणारे राजस्थानच्या बिकानेर शहरातील सुधीर लुणावत यांच्यासाठी बुरुंडी बँकेने ही नोट पाठवली आहे. यापूर्वी २०१७ साली मलेशियाने छापलेली ६०० रिंगिटची नोट जगातील सर्वांत मोठी बँकनोट ठरली होती.
या नोटेवर सिंह, जिराफ, म्हैस, बिबट्या, आफ्रिकन हत्ती व गेंड्यावर बसलेला एक दुर्मीळ आफ्रिकन पक्षी दाखवण्यात आला आहे. दुस-या बाजूला फ्रेंच भाषेत नोटचे वर्णन केले असून त्या भागाच्या डिझाइनमध्ये बुरुंडीचे राष्ट्रीय चिन्ह, पारंपरिक नृत्य, ढोलकी वाजणा-यांचे चित्र, राष्ट्रपतींचे निवासस्थान, राष्ट्रीय ध्वज आणि सेंट्रल बँकेचा लोगो व नकाशा समाविष्ट केलेला आहे.
सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये दोन सुरक्षा धागे, ग्लोबचा वॉटरमार्क तसेच नोटेवर दोन सोनेरी तारे असून वेगवेगळ्या कोणातून त्याकडे पाहिल्यास रंग बदलतात. बुरुंडी सरकारने या प्रकारच्या केवळ एक हजार नोटा छापल्या आहेत. त्यामुळे ही नोट संग्रहात ठेवण्यासाठी जगभरातून मागणी होत आहे.