पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील १३व्या दिवसाची भारताची सुरुवात संमिश्र राहिली. भारताच्या अंशू मलिकला पहिल्याच सामन्यात हार पत्करावी लागलेली असताना पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात अमन सेहरावतने उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश केला.
महिलांच्या ५७ किलो वजनी गटात अंशूसमोर पहिल्याच लढतीत अमेरिकेच्या हेलन मॅरोलिसचे आव्हान होते. मॅरोलिसने ऑलिम्पिकमध्ये २०१६ ला सुवर्ण आणि २०२१ ला कांस्यपदक जिंकले आहे आणि ती सातवेळची वर्ल्ड चॅम्पियन आहे. त्यामुळे अंशूचा निभाव लागणे अवघड होते. तरीही अंशूने दोन गुण घेतले, परंतु तिला २-७ अशी हार मानावी लागली. मॅरोलिस फायनलमध्ये पोहोचल्यास अंशूला रेपेचेज राऊंडमधून पदक जिंकण्याची संधी मिळू शकते. पुरुष गटात अमनने नॉर्थ मॅकाडोनियाच्या व्हॅदिमीर इगोरोव्हचा १०-० असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर अल्बेनियाच्या झेलिमखानचे आव्हान होते. अबाकारोव्ह हा २०२२ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आहे आणि त्याने २०२३च्या युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. अमनने पहिल्या ३ मिनिटांत ३ -० अशी आघाडी घेतली. दुस-या सत्रात त्यानेन अल्बेनियाच्या खेळाडूवर डाव टाकला आणि मगर पकड घेताना १२-० अशा आघाडीसह उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला.
११ वर्षांचा असताना आई-वडिलांना गमावले
अमन सेहरावत हा हरियाणातील बिरोहर, झज्जर जिल्ह्यातील सेहरावत गोत्रातील जाट कुटुंबातील आहे. ११ वर्षांचा असताना त्याने आपले आई-वडील दोन्ही गमावले. सेहरावतने २०२१ मध्ये पहिले राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. त्याने ललित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. जानेवारी २०२४ मध्ये, त्याने झाग्रेब खुल्या कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात अंतिम फेरीत चीनच्या झोऊ वानहाओला १०-० असे पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते. भारताकडून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र ठरलेला तो एकमेव पुरुष कुस्तीपटू आहे. २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले आणि २०२३ मध्ये आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.