नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका २१ डिसेंबर रोजी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोजित करणारे रिटर्निंग अधिकारी न्यायमूर्ती (निवृत्त) एमएम कुमार यांनी शनिवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, मतदान आणि निकाल त्याच दिवशी जाहीर केले जातील. निवडणुकीचा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या याचिकेच्या निकालाच्या अधीन असणार आहे. निवेदनात म्हटले आहे की, निवडणुकीच्या तयारीचे सर्व टप्पे आणि उमेदवारांची यादी ७ ऑगस्टलाच अंतिम करण्यात आली आहे.
ही निवडणूक विशेष सर्वसाधारण सभेच्या दिवशी होणार असून ७ ऑगस्ट रोजी मतदार यादीच्या आधारे ही निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने सुरू करावी लागेल, या भीतीला पूर्णविराम मिळाला आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजे ११ ऑगस्ट रोजी स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवली असून निवडणूक प्रक्रियेसाठी नवीन वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.