इस्लामाबाद : पाकिस्तान पुन्हा फाळणीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याची शक्यता दाट आहे. भारताला डिवचल्याचे गंभीर परिणाम पाकड्यांना भोगावे लागत आहे. अणुबॉम्ब ठेवलेल्या शहरांवर ड्रोन हल्ले झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार उडाला आहे. तर दुसरीकडे बलुचिस्तान पाकिस्तानच्या जोखडातून मुक्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचे झेंडा उतरवण्यात आले आहेत.
बलुचिस्तानमध्ये बंडाचे वारे वेगाने वाहत आहे. बलुचिस्तानमधील अनेक भूभाग बलुच आर्मीच्या ताब्यात आला. त्यामुळे एकीकडे आज झालेले १२ दहशतवादी हल्ले आणि त्यातच बलुचिस्तानमध्ये सुरू असलेली गडबड यावरून स्वतंत्र बलुचिस्तानची लवकरच घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. बलुचिस्तानमध्ये पूर्वीपासूनच पाकिस्तानला कडाडून विरोध होता. पण जबरदस्तीने हा भाग पाकिस्तानमध्ये सामावून घेण्यात आला.
तेव्हापासून पाकिस्तानविरोधात येथील लोकांचा स्वातंत्र्य लढा सुरू आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान लष्कराने स्थानिक जनतेवर अमानुष अत्याचार केले आहेत. महिलांवर बलात्कार केले आहेत. अनेक बलुच नेत्यांना ठार केले आहे. त्याचा बदला हे लोक घेत आहेत. भारताने काल पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केल्यानंतर बलुच लोकांनी आनंदोत्सव साजरा केला. दोन वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणांहून पाकिस्तानचे झेंडे उतरवण्याची मोहीम सुरू होती. पण गेल्या दोन दिवसांपासून त्यात मोठी वाढ झाली आहे.
अनेक सार्वजनिक ठिकाणांहून पाकिस्तानचे झेंडे उतरवले गेले आहेत. या वर्षाच्या सुरूवातीलाच बलुचबहुल भागातील शाळा, सरकारी दवाखाने, सरकारी कार्यालयात सुद्धा पाकिस्तानचा झेंडा फडकवला जात नसल्याची माहिती जमीयत उलेमा-ए-इस्लाम(एफ) पक्षाचे ज्येष्ठ नेते मौलाना अब्दुल गफूर हैदरी यांनी दिली होती. इतकेच नाही तर बलुच लोक स्वत:चे राष्ट्रगीत म्हणताना दिसतात. त्यांचा पाक सरकारवरील रोष नवीन हल्ल्यातून दिसून येत आहे.
मंगोचर शहर ताब्यात
बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मीच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ३ मे रोजी, बीएलएने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील कालात जिल्ह्यातील मंगोचर हे शहर ताब्यात घेतले आहे. बीएलएने सरकारी इमारती आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करून त्यावर नियंत्रण मिळवले. बीएलएचच्या ‘डेथ स्क्वॉड’ ने शहरात अनेक ठिकाणी चेकपॉइंट्स उभारले आहेत.
१४ पाकिस्तानी जवान ठार
आज बीएलएचने एक ताजा व्हीडीओ समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. त्यात एका डोंगरद-यातील रस्त्यावर पाकिस्तानी लष्कराचे वाहन जाताना ते आयईडीने उडवण्यात आल्याचे दिसते. या ताज्या हल्ल्यात बीएलएने १४ पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा करण्यात येत आहे. भारत आणि बलुच आर्मीमध्ये पाकिस्तानची मोठी कोंडी झाली आहे.