मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीला नवी दिशा देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईकडून रणजी ट्रॉफी खेळताना यशस्वी आता यष्टीरक्षण करताना दिसणार आहे. मुंबईचा कर्णधार सिद्धेश लाड याने प्रसारमाध्यमांशी बोलताना याला दुजोरा दिला असून यशस्वी नेट सरावात आपल्या यष्टीरक्षणाच्या कौशल्यात सुधारणा करत असल्याचे सांगितले. सध्या यशस्वी जैस्वालचे भारतीय कसोटी संघात स्थान पक्के असले, तरी टी २० संघातून तो बाहेर पडला आहे आणि एकदिवसीय संघातही त्याला नियमित संधी मिळत नाही. भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी आणि ते स्थान दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी त्याने फलंदाजीसोबतच यष्टीरक्षणाची जबाबदारीही घेण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे.
यशस्वी जैस्वालची प्रथम श्रेणी कारकीर्द अत्यंत प्रभावी राहिली आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५४ च्या चमकदार सरासरीने ४,९६८ धावा केल्या आहेत. यामध्ये १७ शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे. रणजी ट्रॉफीचा पहिला सामना खेळल्यानंतर यशस्वी न्यूझीलंड दौ-यावर जाणार असून, तेथे कसोटी मालिकेपूर्वी तो इंडिया ए संघाकडून खेळणार आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे, भारतीय संघ सध्या २०२७च्या वनडे विश्वचषकासाठी तयारी करत आहे. भारताकडे सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी आहे. त्यामुळे यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळणे कठीण झाले आहे. अशा वेळी संघात काहीही करून जागा मिळावी यासाठी त्याने नवा पर्याय निवडल्याचे दिसते.
















