मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारण बदलवून टाकणारी एक मोठी युती भविष्यात होऊ शकते. या युतीचे संकेत दोन्ही ठाकरे बंधुंनीच काही दिवसांपूर्वी दिले होते. राज ठाकरे यांनी अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यासोबतची भांडण फार किरकोळ आहेत महाराष्ट्र मोठा आहे असे विधान केले आणि त्याला तात्काळ प्रतिसाद देत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किरकोळ वाद बाजूला ठेवण्यास मी तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची जोरदार चर्चा राज्यभर सुरू झाली.
सध्या दोन्हीही ठाकरे बंधु सध्या परदेशात असल्याने या चर्चेला नेमके कधी मूर्त स्वरुप प्राप्त होईल हे कळू शकले नाही आहे. मनसे शिवसेना युती होते की ही केवळ चर्चा राहते हे लवकरच कळेल. दरम्यान ठाकरे गटाने एक पोस्ट करत पुन्हा एकत्र येण्याच्या विषयाला हात घातला आहे. शिवसेना ठाकरे गटाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये मुंबई महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे अशा स्वरुपाचा आशय लिहिला आहे.
एकदा घोषणा झाली की मग वादळ आणि फक्त वादळ
या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडला असून लवकर एकत्र या, एकत्र या लवकर मग कशी मज्जा येते विरोधकांची ते बघायला संपूर्ण महाराष्ट्र आतुर आहे. प्रत्येक मराठी माणूस या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय. एकदा घोषणा झाली की मग वादळ आणि फक्त वादळ. राजउद्धव. अशा कमेंटस युजर्सनी केला आहेत.
एकत्र आले तर दोघांनाही फायदा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास म्हणजेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने युती केल्यास त्याचा मोठा फायदा दोन्ही पक्षांना होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याला नवा पर्याय मिळेल. येत्या काही महिन्यात मुंबई आणि राज्यातील महत्त्वाच्या शहरातील महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना फायदा होईल. मुंबई मराठीच्या मुद्यावर दोन्ही पक्षांकडून आक्रमक प्रचार करून महापालिकेत सत्ता स्थापन करता येऊ शकते. जर एकत्र राहिल्यास दीर्घकालिन अनेक फायदे होऊ शकतात. मात्र यासाठी दोन्ही पक्षांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.
काय आहे शिवसेनेची पोस्ट?
वेळ आलीयं, एकत्र येण्याची
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी
शिवसैनिक तयार आहे,
मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!