अकोला : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यामध्ये भारत जोडो अभियानच्या कार्यक्रमात गोंधळ घालत योगेंद्र यादव यांचे भाषण बंद पाडले. कार्यकर्त्यांच्या सुरक्षेच्या वेढ्यात योगेंद्र यादव यांना कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढण्यात आले. भारत जोडो अभियानाच्या वतीने विचारसभा आयोजित केली होती. या विचारसभेत योगेंद्र यादव बोलत असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा करत सभा बंद पाडली.
योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात ‘लोकशाही सुरक्षा आणि आपलं मत’ या चर्चेवर विचारसभा सुरू होती. वंचितच्या कार्यकर्त्यांनी या सभेत गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी सभा ठिकाणावरील खुर्च्या आदळल्या. लोकांना कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढले. व्यासपीठावर धाव घेत वंचितच्या कार्यकर्त्यांनी माईकची देखील तोडफोड केली. तसेच योगेंद्र यादव यांना घेरले.
योगेंद्र यादव यांना पोलिसांनी कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढले. मात्र, वंचितच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र यादव यांच्या गाडीवर लाथा-बुक्क्या मारल्याची माहिती आहे. १५० मतदारसंघांत ‘भारत जोडो’ : विविध संघटनांनी एकत्रित येऊन भारत जोडो अभियान सुरू केले आहे. ‘भारत जोडो’कडून महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ पैकी १५० मतदारसंघांत काम करण्यात येणार आहे. यामध्ये विदर्भातील ४० जागांचा समावेश आहे, असे भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी सांगितले होते.