मुंबई : प्रतिनिधी
अध्यक्ष महोदय, ‘मी पुन्हा येईल’असे तुम्ही म्हणाला नव्हता. तरी तुम्ही परत आलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुम्ही खुर्चीला न्याय देण्याचे काम कराल. नाना भाऊ (नाना पटोले यांना उद्देशून) तुम्ही वाट मोकळी केलीत म्हणून नार्वेकरांना संधी मिळाली, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील भाषणादरम्यान लगावला.
राहुल नार्वेकर यांची पुन्हा विधानसभा अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सहमती दिली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांचे फेरनिवडीबद्दल अनुमोदन दिलं. त्याशिवाय विरोधी पक्षाचे आणि गटनेत्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने केलेले आधीचे काम आणि पुढची दिशा कशी असेल, याबाबत वक्तव्य केले.
पाच वर्षांच्या या संक्रमण काळात मीडियाचे तुमच्याकडे लक्ष होते. नार्वेकर अभ्यासू आणि संयमी व्यक्तिमत्त्व आहे. मुंबई कोकणात अनेक दिग्गजांनी जन्म घेतला. सलग दुस-यांदा अध्यक्ष होण्याचा मान फक्त ४ लोकांनाच मिळाला आहे. त्यात आपण गणले जाणार आहात. सभागृहाचे काम आणि नियम यांचा अध्यक्षांचा चांगला अभ्यास आहे, असे कौतुक यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांचे केले.
सभागृहाच्या दालनांचा चेहरा अध्यक्षांनी बदलला. कितीही गरम चर्चा झाली तरी त्यांच्या दालनातील कॉफीने वाद संपतात. ते डावीकडील आणि उजवीकडील आवाज ऐकतात. त्यांना डावीकडील आवाज सूक्ष्मपणे ऐकावा लागेल. (विरोधी पक्षाच्या संख्खेवर फडणवीसांचा टोला) आम्ही विरोधी पक्षाचा आवाज ऐकू. ज्या कुलाबा मतदारसंघात विधानसभा आहेत, त्याचे आमदारही आपण आहात, आम्ही सर्व आपल्या मतदारसंघात असल्याने आमची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, अशी जाणीव देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकरांना करून दिली.