नवी दिल्ली : खजुराहो येथील प्रसिद्ध जावरी मंदिरातील भगवान विष्णू यांच्या खंडित मूर्तीची दुरुस्ती करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी एक टिप्पणी केली होती. यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला. एवढेच नाही, तर विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनेनेही सरन्यायाधीशांना वाणीवर संयम ठेवण्याचा सल्ला दिला होता.
आता यासंपूर्ण प्रकरणावर खुद्द सरन्यायाधीश बी.आर. गवई या भाष्य केले आहे. माझे वक्तव्य सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले. दुस-या दिवशी कुणीतरी मला सांगितले की, माझे वक्तव्य सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो असे गवई म्हणाले.
सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी एका प्रकरणात सुनावणी वेळी केली. यासंदर्भात बोलताना कपिल सिब्बल म्हणाले, आम्हाला अशा गोष्टींचा सामना रोजच करावा लागतो. अशा प्रकारे कुणालाही बदनाम करणे योग्य नाही. सरन्यायाधीश बी.आर. गवई म्हणाले, ‘नेपाळमध्येही अशाच गोष्टी घडल्या होत्या.’ खरे तर, मूर्तीच्या दुरुस्तीच्या मागणीसंदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला फटकारत तुमची याचिका जनहित याचिका नाही, तर प्रचार याचिका आहे. जर तुम्ही भगवान विष्णूंचे एवढे कट्टर भक्त असाल तर मग त्यांच्याकडेच प्रार्थना करा, असे म्हटले होते. त्यांच्या टिप्पणीचा हा भाग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि लोक त्यांच्यावर टीकाही करत होते.
विश्वहिंदू परिषदेची प्रतिक्रिया
यासंदर्भात गुरुवारी विश्व हिंदू परिषदेचीही प्रतिक्रिया आली. संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी सरन्यायाधीशांच्या नावे एक पत्र लिहिले. या पत्रात म्हणण्यात आले आहे की परवा सर्वोच्च न्यायालयात खजुराहो येथील प्रसिद्ध जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या खंडित मूर्तीच्या दुरुस्तीसंदर्भातील याचिकेवर सुनावणी होती. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी मौखिक टिप्पणी केली, मूर्तीच्या दुरुस्तीसाठी भगवंतांकडेच प्रार्थना करा. आपण म्हणता की, आपण भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात, तर आता त्यांच्याकडेच प्रार्थना करा. न्यायालय हे न्यायाचे मंदिर आहे. भारतीय समाजाची न्यायालयांवर श्रद्धा आणि विश्वास आहे. आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की, हा विश्वास केवळ कायमच राहू नये, तर तो अधिक दृढ व्हावा.
न्यायाधिशांनीही वाणीवर संयम ठेवायला हवा
पुढे सल्ला देताना विश्व हिंदू परिषदेने म्हटले की, आपणा सर्वांचे कर्तव्य आहे की आपण आपल्या वाणीवर संयम ठेवायला हवा. विशेषत: न्यायालयात. ही जबाबदारी खटला लढवणा-यांची आहे, वकिलांची आहे आणि तितकीच न्यायाधीशांचीही आहे. आम्हाला वाटते की सरन्यायाधीशांच्या मौखिक टिप्पणीमुळे हिंदू धर्माच्या आस्थांचा उपहास झाला आहे. अशा प्रकारच्या टिप्पण्या टाळल्या तर बरे होईल.