धाराशिव : सतीश टोणगे
धाराशिव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या जिल्ह्यात अनेक वेळा राजकीय घडामोडी घडल्या, पण निष्ठावंत शिवसैनिकांनी आपली निष्ठा कधीही ढळू दिली नाही. या जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सभा झाल्या त्यावेळी अनोळखी, सर्वसामान्य शिवसैनिक यांना उमेदवारी देऊन आमदार, खासदार केले पण कधीही बंड केले नाही. राज ठाकरे, नारायण राणे, छगन भुजबळ, यांनी सेना सोडूनही या जिल्ह्यावर त्याचा कधीही परिणाम झाला नाही. सध्या राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे. कार्यकर्त्यांना किंमत राहिली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले असले तरी या जिल्ह्यात म्हणावा तेवढा फरक पडला नाही. जर धनुष्यबाण घेऊन कोणी लढले असते तर मात्र न सांगता मतदान झाले असते व ठाकरे गटाचे अवघड झाले असते. उद्धव ठाकरे यांच्या सेनेला मशाल चिन्ह मिळाल्याने शिवसैनिकांचा कल मशालीकडे असू शकतो. आता शिवसैनिक कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. या जिल्ह्यातील शिवसैनिक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मतदान करण्याच्या मन:स्थितीमध्ये नाहीत. त्यामुळे, ‘तुम्हीच सांगा घड्याळाला कसे मतदान करायचे…’ असा सवाल विचारला जात आहे.
वर्षानुवर्षे ग्रामीण भागात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत असते. निष्ठावंत शिवसैनिक सेनेच्या उमेदवाराशिवाय मतदान करू शकत नाही. त्यामुळे शिंदे गटाचे शिवसैनिक अद्याप प्रचारात नाहीत. प्रचाराला लागा असा आदेशही कोणाचा आला नसल्याचे, शिंदे गटाचे कार्यकर्ते सांगत आहेत. सेनेप्रमाणेच भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचीही भूमिका असून खाजगीत आम्ही कमळ, बाण सोडून कधीही मतदान केले नाही. मग आता घड्याळाला मतदान करण्याची इच्छा होत नाही, असे सांगत आहेत. आज तरी घड्याळाचे काटे अडचणीत सापडले आहेत. या मतदारसंघात बार्शी, औसा, तुळजापूर हे भाजपचे आहेत. तर धाराशिव ठाकरे गट, उमरगा, भूम -परंडा हे मतदारसंघ शिंदे गटाकडे असताना हे घड्याळ कुठून आले, असा सवाल मतदार विचारत आहेत. त्यामुळेच पालकमंत्री तानाजी सावंत हे आज तरी ‘नॉट रिचेबल’आहेत. त्यामुळे आ. राणा दादा पाटील यांना सर्वांची मनधरणी करण्यात दमछाक होणार आहे.