मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ‘ठाणे कि रिक्षा’ या विडंबन गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शिंदे यांना गद्दार म्हटल्याने कामरा राजकीय वादात सापडला आहे.
त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असून हजर राहण्याच्या नोटीसा दिल्या जात आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. तर काही सेलिब्रिटींनीही यावर त्यांचे मत मांडले. आता दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी यावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
‘अशी ही जमावाजमवी’ या सिनेमाच्या निमित्ताने अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांनी नुकतीच नवशक्तीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी स्टँडअप कॉमेडी आणि कुणाल कामराबाबत भाष्य केले. स्टँडअप कॉमेडी हा विनोदाचा एक प्रकार आहे. आणि तो चांगला प्रकार आहे. एका ठिकाणाहून उभे राहून केलेल्या डायलॉगला यात जास्त महत्त्व आहे. त्याला बाकी बॅकग्राऊंड काही नसते. फक्त पंचला महत्त्व आहे. एक पंच तुम्ही किती चांगला खिळवत ठेवू शकता, हे महत्त्वाचे असते. टिंगल करूनही तुम्ही कॉमेडी करू शकता. पण, अस्सल कॉमेडी करुन दाखवा.
वंदना गुप्तेंनेही मांडले मत
मला असे वाटते की दुस-यांची टिंगल उडवतच स्टँडअप कॉमेडी उभी राहते. त्याच्याशिवाय ती कॉमेडी होऊ शकत नाही असे त्या म्हणाल्या. कुणाल कामराबाबत त्या म्हणाल्या, दुस-याची टिंगल करण्यात तुम्ही कशाला आनंद घेता. तुम्ही स्वत:ची गोष्ट सांगा. इलॉजिकल आपल्याकडे चालत नाही. जी लॉजिकल कॉमेडी आहे तीच आपल्याकडे चालते.