पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली असून स्वारगेट एसटी स्टँड आवारात ही घटना घडल्याने महिलांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. दरम्यान या प्रकरणात एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीला बळजबरीने बसमध्ये ओढून नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. ही सर्व घटना मंगळवारी रात्री घडल्याचे समोर आले असून पोलिसांनी रात्रीच एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. स्वारगेट परिसरात नेहमी ब-यापैकी वर्दळ असते. मात्र मंगळवारी रात्री उशिरा या परिसरातील गर्दी कमी झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
रात्री महिला शिवशाही बसच्या जवळून जात असताना तिला संशयित आरोपीने बळजबरीने आत ओढून घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान सदर घटनेमुळे विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले असून अशा प्रकारच्या घटनेला कायमची आळा घालण्याची मागणी करीत आहेत.
कायदा सुव्यवस्थेची लक्तरे निघाली : सपकाळ
पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक असून गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिका-यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.मध्यंतरी मुंबईत शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. पण त्यातील सत्य बाहेर येऊ नये म्हणून सरकारने आरोपीचा एन्काऊंटर करून प्रकरणातील मुख्य सुत्रधारांना वाचवण्याचाच प्रयत्न केला. सर्वच विषयावर बोलणारे राज्याचे मुख्यमंत्री महत्वाच्या विषयावर मात्र जाणीवपूर्वक गप्प बसत असल्याची टीका सपकाळ यांनी केली आहे.
फाशीच्या शिक्षेशिवाय पर्याय नाही : अजित पवार
बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले आहे. दरम्यान परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षेबाबत सर्व संबधितांची बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करू असे सांगितले.
परिवहन मंत्र्यांची आज बैठक
महिलांची सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असल्याने स्वारगेट बसस्थानक वरील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरूवार दि. २७ फेब्रुवारी रोजी महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एसटीच्या वरिष्ठ अधिका-यांची तात्काळ बैठक बोलावली आहे. यामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात ठोस निर्णय होणे अपेक्षित आहे.
२३ सुरक्षा रक्षकांचे निलंबन
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील अत्याचारानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून स्वारगेट डेपोमधील २३ सुरक्षा रक्षक यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे. गुरूवारपासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंर्त्यांकडून देण्यात आले आहेत. तर स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांचे चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे.