सोलापूर : विद्युत फीडर बंद करताना चूक झाली. डीपीवर चढलेल्या मुस्ती गावच्या कुमार तानाजी घाडगे (२७) या तरुणाला ११ हजार वोल्ट विजेचा धक्का लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला. जमिनीपासून ३५ फुटावर त्याचा मृतदेह लोंबकळत राहिला.
तब्बल चार तासांनी मृतदेह खाली उतरवण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी मुस्ती शिवारात ही दुर्घटना घडली. पाच वर्षात एकसारखी दुर्घटना दुस-यांदा घडली आहे. संगदरी व मुस्ती या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी राचप्पा नागप्पा बचुटे यांच्या शेताजवळ दोन डीपी (ट्रान्सफॉर्मर) आहेत. दीड महिन्यापूर्वी मुस्ती गावचे काही डीपी संगदरी गावच्या फीडरवर घेतले होते. ही बाब लाईनमनच्या ध्यानात राहिली नाही. त्याने नेहमीप्रमाणे मुस्तीचे फीडर बंद करून घेतले. आणि संगदरीच्या फीडरवर सुरू असलेल्या डीपीवर कुमार याला चढवले.
परिणामी दुर्घटना घडली. कुमार याला महावितरणच्या कामाचा काहीसा अनुभव होता. तिघे भाऊ असलेल्या घाडगे कुटुंबातील कुमार हा छोटा मुलगा. तो अविवाहित होता. आपल्या गावाची लाईट कशी काय नाही, गावच्या डीपीत काय बिघाड झाला, हे पाहण्यासाठी तो डीपीवर चढला होता. त्याला जमादार याने प्रवृत्त केले होते. त्या डीपीवरून वीजपुरवठा सुरू होता, वर चढल्यावर तारेला त्याचा हात लागला आणि शॉक लागून कुमारचा जागीच मृत्यू झाल्याचे वळसंग पोलिसांनी सांगितले.
डीपीवर चढल्यावर वीजेचा शॉक लागून मृत्यू होऊ शकतो, याची माहिती असताना देखील जमादार याने कुमार घाडगेला डीपीवर चढविले आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी जमादारविरुद्ध वळसंग पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत. मुस्ती या गावात १५ ऑगस्ट २०२१ रोजी लक्ष्मीकांत तोरकडे (२१) या तरुणाचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी डीपीवर चढल्यावर अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. वीजेचा शॉक लागल्याने तोही असाच डीपीवर लटकला होता.