नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढत असलेल्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षातील वादाचे हादरे इंडिया आघाडीला बसताना दिसत आहे. त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीला तडा जातो की काय अशीही चर्चाही सुरू झाली आहे. कारण काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याच्या हालचाली आपने सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे आम आदमी पक्ष नाराज झाला असून, आता काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याची भूमिका घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच दिल्लीतील राजकारणाचा पारा वाढला आहे. काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी आपचेअरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर गंभीर आरोप करत तक्रार केल्याने आप नाराज झाली आहे. अरविंद केजरीवालांना देशविरोधी म्हणत, ते अस्तित्वात नसलेल्या योजनांवरून लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला. काँग्रेसने अशा पद्धतीने हल्ला चढवल्याने आम आदमी पक्षाचे नेतेही आक्रमक झाले आहेत.
आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते अजय माकन आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांच्यावर हल्ला चढवला. मुख्यमंत्री आतिश यांच्यासोबत घेतलेल्या परिषदेत खासदार सिंह म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना देशविरोधी म्हणणा-या अजय माकन यांच्यावर काँग्रेसने २४ तासात कारवाई करावी. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी काँग्रेस सर्व काही करत आहे असा गंभीर आरोप सिंह यांनी केला.
काँग्रेसचे अजय माकन हे भाजपची स्क्रिप्ट वाचत आहेत. काँग्रेसने अजय माकन यांच्याविरोधात कारवाई केली नाही, तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून काढून टाकावे, अशी मागणी आम आदमी पार्टी आघाडीतील घटक पक्षाकडे करणार आहे असे खासदार सिंह म्हणाले.
इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याच्या चर्चा
महाराष्ट्र आणि हरयाणात काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाल्यापासून इंडिया आघाडीचे नेतृत्व बदलण्याची मागणी होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांनीही ममतांना पाठिंबा दिला आहे. आता आम आदमी पक्षाने काँग्रेसला थेट इंडिया आघाडीतून बाहेर काढण्याची भूमिका घेतल्याने विरोधकांच्या एकजुटीबद्दलच्या चर्चेने डोकं वर काढले आहे.