22 C
Latur
Thursday, August 28, 2025
Homeलातूरलातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी

लातूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंसह लाखो मराठे बांधव बुधवारी मुंबईकडे कूच करत असतानाच लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकार वेळकाढूपणा करते, जरांगेंना वारंवार उपोषण करायला भाग पाडतेय असा आरोप करत एका तरुणाने विष प्राशन केले. सुदैवाने या तरुणाचा जीव वाचला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बळीराम मुळे (वय ३५) असं या युवकाचे नाव आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात चलो मुंबई अशी घोषणा देत मुंबईकडे कूच करण्यात येणार आहे. या मुद्यावरून राज्यभर वातावरण अधिकच तापल्याचे दिसत आहे. त्याचवेळी अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बु्द्रुक येथील बळीराम मुळे या युवकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार वेळकाढूपणा करत आहे, मनोज जरांगे यांना वारंवार उपोषणाची वेळ आणली जात आहे अशा शब्दांत त्याने चिठ्ठी खिशात ठेवली आणि नंतर विष प्राशन केले. बळीराम मुळे याच्यावर लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बळीराम मुळे याचे लग्न झालेले असून दोन मुली आहेत. भावासोबत दहा एकर कोरडवाहू शेती तो कसत आहे. काही दिवसांपासून तो मुंबईला आंदोलनासाठी जाण्याची तयारी करत होता. मंगळवारी सायंकाळी शेतात जाऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने त्याला तात्काळ लातूर येथील कवठाळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मनोज जरांगे यांनी दिलेल्या ‘चलो मुंबई’ च्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने आंदोलनासाठी मुंबईकडे निघण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी अशा काही घटनेमुळे समाजात एकाचवेळी हळहळ आणि सरकार विरोधात संताप व्यक्त होत आहे.

लातूरमध्ये मोर्चासाठी सर्व तयारी पूर्ण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर पुन्हा आंदोलनाची लाट उसळली असून लातूर जिल्ह्यातूनही त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. गावागावातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने बुधवारी मुंबईकडे रवाना होणार आहेत. प्रवासादरम्यान तसेच रोजच्या आहारासाठी समाज बांधवांकडून चिवडा, बुंदी, लाडू यासह अन्नधान्याचा साठा करून ठेवण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR