भूम : प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभर आरक्षणाचा लढा चालू आहे. परंतु सरकार काहीच पावले उचलताना दिसत नाही. मराठा आरक्षण नावाची चिठ्ठी लिहून गिरवली (ता.भूम) येथील अमरनाथ भाऊसाहेब कदम या २४ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील गिरवली येथील अमरनाथ भाऊसाहेब कदम या २४ वर्षीय तरूणाने अंजनसोंडा शिवारातील गट नंबर ५१ मधील स्वत: च्या शेतातील बांधावर आलेल्या लिंबाच्या झाडाला त्याच्या जवळ असलेल्या भगव्या गमजाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.२२) रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या जवळ मराठा आरक्षण असे लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. तो एकुलता एक मुलगा असल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीसांनी पंचनामा करुन वाशी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अच्युत कुटे करीत आहेत.
आत्महत्या केलेला मयत तरूण अमरनाथ कदम हा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील सभेला उपस्थित राहिला होता. तो आरक्षणच्या या लढ्यात सक्रिय सहभाग तो घेत होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गावातील साखळी उपोषणामध्ये त्याने सहभाग नोंदवला होता.