बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यभरात मराठा समाजाने आंदोलने, रास्ता रोको, साखळी आंदोलने केली. सरकारने मराठा समाजाशी चर्चा करत काही दिवसांचा वेळ घेतला आहे. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अनेकांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. अशातच आणखी एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी एका २२ वर्षीय ऑटोरिक्षाचालक तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बीडच्या धारूर तालुक्यात असणा-या देवठाणा गावात घडली आहे. प्रवीण बाबुराव सोळंके (वय २२, रा. देवठाणा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मृत प्रवीणच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये ‘मी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत आहे’ असा मजकूर लिहिलेला आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एपीआय दहिफळे करत आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात दौरे करत सभा घेत आहेत. या सभांमधून ते मराठा आरक्षणासाठी आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. तसेच जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे.