28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रनागपुरात युवक काँग्रेस रस्त्यावर

नागपुरात युवक काँग्रेस रस्त्यावर

नागपूर : राज्यात लाखो सरकारी पदे रिक्त आहेत. या पदांसाठी सरकारने जाहिरात देऊन तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करत युवक काँग्रेस नागपुरात रस्त्यावर उतरली. युवक काँग्रेसचा शुक्रवारी विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवकचे प्रदेशाध्यक्ष कुमार राऊत यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सर्व आंदोलक तरुण आक्रमक झाले.

हे सरकार तरुणांचा आवाज दाबायला लागले हे. तरुणाईला बरबाद करण्याचे काम हे सरकार करत आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार होते त्यावेळेसही महाभरतीच्या नावाने ऑनलाईन पद्धतीने तरुणांना लुटण्यात आले. नोकऱ्या दिल्या नाहीत, असे पटोले म्हणाले.

पोलिसांनी हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्नही केला. सरकारविरोधात युवक काँग्रेस आक्रमक असल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी नाना पटोले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. युवक काँग्रेसचे म्हणणे आहे की, टीएआयटी परीक्षेला ९ महिने उलटले तरी अद्याप शिक्षक भरतीची जाहिरात देण्यात आलेली नाही. एसटी, अनुसूचित जातीसह विविध प्रवर्गांना सरकारने गेल्या २ वर्षांपासून शिष्यवृत्ती दिली नाही.

विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विविध शैक्षणिक भत्तेही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे महाविद्यालयांनाच नव्हे तर विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. सरसकट दुष्काळ जाहीर करावा, विनाअट विमा, प्रती एकर ५० हजार रूपये नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, बेरोजगारीचा प्रश्न सुटावा व अन्य मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. दीक्षाभूमी ते टी-पॉईंट दरम्यान हा मोर्चा निघाला.

१६ लाख तरुण राज्यातून बाहेर गेले
युवक काँग्रेसने म्हटले आहे की, बार्टीच्या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते. यावर लवकर उपाय योजला पाहिजे. मिहानमधील तरुणांना अपेक्षेप्रमाणे रोजगार मिळालेला नाही. २२,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणारा टाटा एअरबस प्रकल्पही रद्द करण्यात आला. गेल्या १० वर्षांत राज्यातून शिक्षण घेतलेले १६ लाख तरुण बेंगळुरू, गुडगाव, हैदराबादसह परदेशात गेले आहेत.

तरुणांचा उद्रेक होणे साहजिक’
नाना पटोले म्हणाले की, बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे सरकार तरुणांचे आयुष्य खराब करायला निघाले आहे. पोलीस दलातही मोठी पदे खाली आहेत. सर्व विभागात पदे खाली असताना ऑनलाईनच्या नावाने तरुणांना लुटले जात आहे. हे चीटफंडवाले सरकार आहे. या सरकारने पिढी बदनाम करण्याचं काम केले आहे. त्यामुळे तरुणांचा उद्रेक होणे साहजिक आहे, अशी भूमिका नाना पटोल यांनी मांडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR