सोलापूर : औज येथील मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी परमेश्वर श्रीशैल तुपे राहणार औज तालुका दक्षिण सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती किशोर संत यांनी अपिलात जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी की, दि:-10/5/2015 रोजी पीडितेवर बळजबरीने दुष्कर्म केले होते ते तसेच दि:- 29/7/2015 रोजी परमेश्वर तुपे व त्याचा भाऊ प्रशांत हे पिडितेस दमदाटी करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची फिर्याद पीडितेने दि.30/07/2015 रोजी मंद्रुप पोलीस ठाण्यात दिली होती त्यावरून सदरचा खटला हा जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे चालला होता.
सदरच्या खटल्यात आरोपींस सात वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली होती. सदर शिक्षेविरुद्ध आरोपीं परमेश्वर तुपे याने अँड. रितेश थोबडे यांचेमार्फत अपील दाखल केले होते, त्या अपीलामध्ये जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस अँड.रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात खटल्यांमध्ये झालेल्या साक्षीदारांच्या साक्षी पाहता त्यामध्ये सयुक्तीपणा दिसुन येत नसल्याचा मुद्दा मांडला . त्यावरून न्यायमुर्तींनी आरोपी परमेश्वर तुपे यास 30,000 रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. यात आरोपी तर्फे अँड .रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे अँड.एम. आर. तिडके यांनी काम पाहिले.