उदगीर : वाचन संस्कृती रूढ व्हावी, कर्तुत्वान महिलांचा परिचय व्हावा, विद्यार्थिनींच्या वक्तृत्व कौशल्याचा विकास व्हावा यासाठी चला कवितेच्या बनात या साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गेल्या कित्येक वर्षांपासून नवयुवतींना बोलते करणे व कृतत्ववान महिलांचे चरित्र माहित करून देण्याच्या उद्देशाने युवती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.
या व्याख्यानमालेचे हे अकरावे वर्ष. डॉ. वर्षा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सदरील व्याख्यानमालेत कु. राजनंदिनी सीमा बाळासाहेब बेळकुंदे, अहमदपूर या नववीत शिकणा-या विद्यार्थिनीने सुनीता विल्यम्स, या व्यक्तीमत्वाचा अप्रतिम असा इंग्रजीत व ओघवत्या शैलीत परिचय करून दिला. यानंतर श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बी.एस्सी. द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी कु. सादिया रिजवाना नदीम सय्यद हिने ग्रेटा थुनबर्ग यांचा परिचय दिला, कु. गायत्री रुक्मिण सुदर्शन सूर्यकर या छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय उदगीर येथे शिक्षण घेत असलेली बी.ए. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने समिधा पाटील यांचे चरित्र उभे केले, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिगोळ येथे इयत्ता सहाव्या वर्गात शिकणारी कु. मानवी अंजली मारुती बिरादार हिने राष्ट्रमाता जिजाऊ याचे कार्यकतृत्व उभे केले.
यानंतर छत्रपति शिवाजी विद्यालय बलसूर, ता. उमरगा जिल्हा धाराशिव येथे इयत्ता १० वीत शिकणारी कु. लक्ष्मी राजेंद्र साखरे, हिने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या महाराणीचे चरित्र व कार्यावर प्रकाश टाकले. या सर्व विद्यार्थिनींनी अतिशय प्रभावीपणे महिलांच्या कार्यावर प्रकाश टाकून श्रोत्यांना अंतर्मुख केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. वर्षा वैद्य म्हणाल्या, अशा व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढत जातो आणि त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार होतात.
यानंतर अनेकांनी या सर्व मुलींचे तोंडभरून कौतुक केले. अहिल्यादेवी होळकर सभागृह (विरंगुळा केंद्र) उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानमालेस विद्यार्थी व रसिक बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी अनेकांनी बोलणा-या विद्यार्थिनींचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन कु. निधी पूजा विवेक रोडगे, वर्ग ५ वा, जिल्हा परिषद प्रशाला देवर्जन या मुलीने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अनंत कदम यांनी केले. तर आभार कांता कलबुर्गे यांनी मानले.