लातूर : २४ वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी पहाटे लातुरातील श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या संकूल परिसरात घडली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. खुनातील आरोपीला अवघ्या बारा तासांत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले, अक्षय उर्फ आकाश राम तेलंगे (रा. गोपाळनगर, लातूर) हा नेहमीप्रमाणे श्री मारवाडी राजस्थान शाळेच्या कोप-यावरील संकुलात रविवारी रात्री मुक्कामी होता. तो दिवसभर शहरात भटकत होता आणि रात्री संकुलाच्या गॅलरीत झोपत होता. दरम्यान, क्वाईल नगर भागातील अक्षय उर्फ भु-या गणपती अंकुशे(२७) याने सोमवारी पहाटे त्याच्या डोक्यात दगड घातला.
त्याची ओळख पटू नये यासाठी दगडाने ठेचून चेहरा विद्रुप केला. सकाळी ८:३० वाजता परिसरातील वाहनतळावर आलेल्या चालक, नागरिकांना घटना समजली. यानंतर त्यांनी शिवाजीनगर ठाण्याला कळविले. घटनास्थळी लातूरचे डीवायएसपी रणजीत सावंत, पो.नि. दिलीप सागर यांनी भेट दिली. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मयताची बहिण गीता अतुल वरटे (२७, रा. पानचिंचोली ता. निलंगा) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी खब-यांची मदत घेतली. सीसीटीव्ही, खब-याच्या माहितीनंतर आरोपीचा शोध लागला. क्वाईल नगरमधून आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिली.
अक्षय तेलंगेवर विविध ठाण्यात गुन्हे
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात अक्षय उर्फ आकाश तेलंगे याच्याविरोधात विविध गुन्ह्यांची पोलिस दप्तरी नोंद आहे. लातुरातील विवेकानंद चौक, शिवाजीनगर, एमआयडीसी, गांधी चौक, लातूर ग्रामीण आणि औसा ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत.
एक वर्षासाठी केले होते तडीपार
टोळी तयार करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणा-या अक्षय उर्फ आकाश तेलंगे याच्यासह इतरांना एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून तडीपार केले होते. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी १७ मार्च २०२५ रोजी जारी केले होते.