मुंबई : दिशा सालियन प्रकरणात गेल्या पाच वर्षापासून सातत्याने आपल्या बदनामीचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालयात जी याचिका दाखल झाली आहे तिला न्यायालयात उत्तर देऊ. तुम्हाला हवी ती चौकशी करा. मी जनतेच्या प्रश्नावर सरकारला प्रश्न विचारत राहणार आहे. महाराष्ट्रात गुन्हे वाढले आहेत. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनातील एक सुद्धा मुद्दा या अर्थसंकल्पात आलेला नाही. औरंगजेबाच्या विषयावर सरकारला एक्स्पोज केले. एका मंत्र्यालाा राजीनामा द्यायला लागला.
माझ्यावर आरोप करून काय होणार? असा सवाल त्यांनी केला. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, खोटेनाटे आरोप करत असाल तर भाविष्यात तुम्हालाच अडचणी निर्माण होतील, असा इशारा दिला. मागील दोन विधानसभा अधिवेशनामध्ये हे प्रकरण आले कसे नाही याचे मला नवल वाटले होते. प्रत्येकवेळी अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो. आमच्या घराण्याच्या सहा ते सात पिढ्या जनतेसमोर आहेत. आमचा या प्रकरणात दुरान्वयानेही संबंध नाही. पण राजकारण वाईट बाजूने न्यायचे असेल तर मात्र सर्वांचीच पंचाईत होईल. तुम्ही खोट्याचा नायटा करत असाल तर तुमच्यावरही हे पलटू शकते असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
तिकडे शेतक-यांच्या चिता पेटत आहेत, त्याला जबाबदार कोण आहे. त्यांच्या चौकशीचे काय? संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यांच्या हत्येचं काय? दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण न्यायालयात चालू आहे. त्यामुळे काय पुरावे आहेत ते न्यायालयात द्यावेत. जे काय आहे ते कोर्टात द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.