पुणे : राज्यात झिकाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभागाने महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. ऑक्टोबरपासून राज्यात झिकाचे ५ रुग्ण सापडले. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. इचलकरंजीत झिकाचे २ रुग्ण सापडले. तर पुणे, कोल्हापूर आणि पंढरपूर येथे देखील प्रत्येकी एका रुग्णाची नोंद करण्यात आली. देशात देखील झिकाचा संसर्ग वाढत आहे. कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात झिकाचा संसर्ग वाढत आहे.
दरम्यान आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हाधिका-यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. पुणे हे राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही झिकाचे रुग्ण वाढत आहेत. येरवडा येथे राहणारी एक ६४ वर्षीय महिला झिका पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तिला ५ नोव्हेंबर रोजी ताप आला होता. रक्ताचा नमुना १० नोव्हेंबरला लॅबला पाठवला. ११ नोव्हेंबर रोजी तिचा झिका पॉझिटिव्ह अहवाल आला. ती १५ ऑक्टोबरला केरळला गेली होती, तेव्हा तिला झिकाची बाधा झाल्याची शक्यता आहे. आता तिची तब्येत स्थिर आहे. तिच्या कुटुंबातील ५ जणांचे रक्त तपासणीसाठी घेतले आहे, त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत.
ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावेत. सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार मोफत आहेत. तसेच झिकाची लागण झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. झिकामुळे मृत्यूचे प्रमाण देखील अत्यल्प आहे.
झिकाची लक्षणे कोणती?
झिकाची लक्षणे सहसा सौम्य असतात. झिकाची लागण झालेल्या ५ पैकी फक्त एका व्यक्तीमध्ये लक्षणे दिसतात. ताप, त्वचेवर लाल ठिपके, सांधेदुखी, डोळे लाल होणे, असे लक्षणे दिसतात. लक्षणे साधारणपणे दोन-तीन दिवसांपासून आठवडाभर टिकतात. नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोगनिदान संस्था, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे झिकाच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.