23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रझिका व्हायरसच्या रुग्णांनी वाढविली चिंता

झिका व्हायरसच्या रुग्णांनी वाढविली चिंता

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ तिन्ही राज्यात व्हायरसमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारची डोकेदुखी वाढली आहे. गुजरातचा चांदीपुरा व्हायरस, महाराष्ट्रात झिका आणि केरळात निपाह व्हायरसमुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. महाराष्ट्रात २८ झिका व्हायरस बाधित रुग्ण आढळून आले. केरळात निपाह व्हायरसमुळे १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसमुळे जवळपास २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

केंद्र सरकारने तिन्ही राज्यातील व्हायरसची वाढती डोकेदुखी लक्षात घेवून केंद्रीय स्तरावर एक कमिटी स्थापन केली आहे. तिन्ही राज्यातील केंद्रीय यंत्रणेसोबत केंद्राची कमिटी बारकाईने काम करणार आहे. केंद्र सरकारने तिन्ही राज्यांना खबरदारीच्या उपाय योजना घेण्याची सूचना दिली आहे. व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी आणि तांत्रिक बाबीवर मदत मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कमिटी स्थापित केली आहे.

दरम्यान, केरळात मुलीला तापाची तीव्र लक्षणे आढळून आली दवाखान्यात भरती करण्याआधीच मुलीची प्राणज्योत मालवली. पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरालॉजी विभागाकडे मुलीच्या व्हायरसचे विषाणू तपासासाठी पाठवण्यात आले होते. रिपोर्टमध्ये निपाह व्हायरसमुळे जीव गेल्याची घटना समोर आली. गुजरातमध्येही चांदीपुरा व्हायरसची झपाट्याने वाढ होत आहे. चांदीपुरा व्हायरसची आतापर्यंत ७१ प्रकरणे समोर आली आहेत.

महाराष्ट्रात झिका व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत ३४ रुग्णांना लागण झाली आहे. राज्य सरकारकडून झिका व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. व्हायरस आढळून आलेल्या जिल्ह्यात विशेष वैद्यकीय कक्ष उभारले जात आहेत. ताप आढळून आलेल्या किंवा गर्भवती महिलेला काही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

पुण्यात सर्वाधिक बाधित
झिका व्हायरसची महाराष्ट्रात ३४ जणांना लागण झाल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये राज्यातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकारकडून झिका व्हायरसच्या प्रसार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी विशेष कक्ष उभारले आहे.

झिका व्हायरसचे लक्षण
झिका व्हायरस साधारण एडीज नावाच्या डासामुळे होतो. याच डासांमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजाराची लागण सुद्धा होते. झिका व्हायरस झालेल्या रुग्णाच्या अंगावर लाल रंगाचे चट्टे दिसतात. तीव्र ताप येतो, शरीराचे सांधे दुखतात, डोकेदुखी होते, अशी ही लक्षणे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR