मुंबई : प्रतिनिधी
दोन्ही हातात बेड्या असणारा माणूस उठून, पोलिसाच्या होस्टरमध्ये ठेवलेले पिस्तूल खेचून गोळीबार कसा करू शकतो?’ याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
दरम्यान, बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. हे एन्काऊंटर होतं की हत्या असा सवाल विचारत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या(शिवसेना) पक्षाचे अधिकृत प्रवक्ते संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे या सगळ्या प्रकरणावर संशय व्यक्त केल्याचा दाखलाही अंधारे यांनी दिला. ‘पोलिसांना त्यांचे काम करू द्यायला पाहिजे, कायद्याची प्रक्रिया बायपास करणं हे संशयास्पद वाटतं. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे’ अशी मागणीही शिरसाट यांनी केल्याचे अंधारे यांनी नमूद केले.