सांगली : प्रतिनिधी
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रामुख्याने सांगली जिल्ह्यात हळदीचे सौदे करण्यात येत असतात. त्यानुसार सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले. यावेळी हळदीला १५ हजार ५०० ते १५ हजार रुपये इतका विक्रमी भाव मिळाला आहे. आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात हळद बाजारपेठेमध्ये दाखल झाली होती.
सांगली जिल्ह्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असते. हळद काढणी झाल्यानंतर अक्षय्य तृतीयेला बाजार समितीमध्ये लिलाव पद्धतीने सौदे करण्यात येत असतात. त्यानुसार सांगलीच्या कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आणली होती. त्यानुसार बाजार समितीमध्ये आज हळदीची सुमारे १४ हजार क्विंटल इतकी आवक झाली होती. तर यंदाचा ९० टक्के सिझन पूर्ण झाला आहे.
आज निघालेल्या मुहूर्ताच्या दरामध्ये मध्यम राजापुरी हळदीला १४ हजार ५०० ते १६ हजार भाव मिळाला आहे. तसेच शेतक-यांनी जास्तीत जास्त हळद कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आणावी; असे आवाहन बाजार समितीकडून शेतक-यांना करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यापारी खरीददार शेतक-यांना चांगले दर मिळाल्यामुळे शेतकरी खुश आहेत. तसेच मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळे मार्केटिंग फास्ट झाले आहे.
केशर आंब्याला मागणी वाढली
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने पंढरपूरच्या बाजारात विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आंबे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. दरम्यान आंब्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या बाजारात स्थानिक गावरान आंब्यासह केशर, मलगोबा, तोतापुरी, हापूस असे विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी बाजारात आले आहेत. दरम्यान यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. केशर आंब्याला चांगली मागणी वाढली आहे. केशर आंबा प्रति किलो १०० ते १५० रुपये दराने विकला जात आहे.