लातूर : प्रतिनिधी
आपत्कालीन परिस्थितीत बचाव करण्यासाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागामध्ये अत्याधुनिक मिनी रेस्क्यू टेंडर वाहन दाखल झाले आहे. मनपा आयुक्त देविदास जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या वाहनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, अग्निशमन अधिकारी गणेश चौधरी, डॉ. शंकर भारती, जरीचंद ताकपिरे आदींची उपस्थिती होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित असणारे हे वाहन आपत्कालीन बचाव कार्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रथम प्रतिसाद देणारे हे वाहन असून ते फोमसह उच्च दाबाच्या पाण्याच्या धुके प्रणालीचा वापर करते.जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी हे वाहन अतिशय उपयुक्त आहे.या वाहनात ३०० लिटर पाण्याची टाकी, ५० लिटर फोमची टाकी,पोर्टेबल पंप, पॉवर पुशर रॅम तसेच स्प्रेडर कम कटर उपलब्ध आहे. आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्य करण्यासाठी उपयुक्त असणारे बोल्ट कटर,फायरमन एक्स, सेवन इन वन टूल किट, फोल्डेबल स्ट्रेचर, मल्टीपर्पज गन व टेलिस्कोपीक लाईट मास्ट यात उपलब्ध आहे. हे वाहन आकाराने लहान आणि वजनाने हलके असल्याने अपघात स्थळी वेगाने पोहोचणे व वेळेत काम पूर्ण करण्यास सक्षम आहे.