25 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार नाराज?

अजित पवार नाराज?

वाढीव जागांसाठी शहांना साकडे, फॉर्म्युला अमान्य?
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत चाललेल्या जागावाटपाच्या घोळामुळे बसलेल्या दणक्यातून धडा शिकलेल्या महायुतीने या वेळी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच जागावाटप पूर्ण करत आणले आहे. अमित शाह यांच्या मुंबई दौ-यात झालेल्या बैठकांनंतरही काही जागांचा तिढा कायम असला तरी क्लिअर झालेल्या जागांपैकी उमेदवारांची पहिली यादी शिंदेंच्या शिवसेनेने सज्ज ठेवली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने संमती दिली तर उद्याच पहिल्या माळेला पहिली यादी जाहीर करण्याची योजना आहे. दरम्यान जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अजित पवारांची राष्ट्रवादी नाराज असून आणखी किमान १२ जागा मिळाव्यात, अशी मागणी अमित शाह यांची भेट घेऊन केल्याचे समजते.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभेची मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार असून त्या पूर्वी महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे संकेत आहेत. त्यामुळे सरकारी व पक्षीय पातळीवरची लगबग वाढली आहे. सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ४० निर्णय घेतल्यानंतर गुरुवारी पुन्हा मंत्रिमंडळ बैठक होत आहे. मंत्रालयातही जोरदार लगबग सुरू आहे. दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. काही ठिकाणी समोरच्या उमेदवारांवर रणनिती निश्चित होणार असली तरी प्लॅन ए, बी तयार आहेत तर काही जागांबाबत अजूनही तिढा असून त्यात वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप केल्याशिवाय हा तिढा सुटणार नाही, असे दिसते.

महायुतीत काही जागांचा अपवाद वगळता विद्यमान आमदारांच्या जागा त्या-त्या पक्षांकडे राहणार आहेत. याबाबत सुरुवातीलाच निर्णय होऊन जवळपास दोनशे जागांचा विषय संपला होता; पण उर्वरित ८५ ते ९० जागांसाठी मात्र बरीच चर्चा झाली. भाजपाच्या स्वत:च्या १०४ व सहयोगी आमदारांच्या १० अशा ११४ जागा आहेत. याशिवाय ४० जागांसाठी त्यांचा आग्रह होता. त्यापैकी ३२ जागांवर निर्णय झाल्याचे समजते.

अजित पवार गटाला
केवळ ५५ जागा?
शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे ४० आमदार आले होते व १० अपक्ष सोबत होते. त्यापैकी बच्चू कडू यांनी वेगळी वाट पकडली आहे. लोकसभेतील स्ट्राईक रेटच्या आधारावर शिंदे यांनी आणखी ५५ जागांवर दावा सांगितला होता. त्यापैकी ३० जागांवर तोडगा निघाल्याचे समजते. अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादीचे ४० आमदार आले होते; परंतु त्यातले अनेक जण परतीच्या वाटेवर आहेत. यामुळे अजित पवार यांना ५२ ते ५५ जागा सोडल्या जातील, अशी चिन्हे आहेत; परंतु अजित पवार यांनी ७० जागांचा आग्रह धरला आहे. यातील बहुतांश जागांवर त्यांची आणि शिंदेंच्या शिवसेनेची रस्सीखेच सुरू आहे.

राष्ट्रवादीचा ७० जागांसाठी आग्रह!
भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गेले २ दिवस मुंबईत होते. त्यांच्या या दौ-यादरम्यान जागावाटपाबाबत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली. याशिवाय काल अमित शाह व अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची बैठक झाली. अमित शाह मुंबईत आल्यापासून राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या मागे होते. आणखी किमान १२ जागा वाढवून मिळाव्यात, राष्ट्रवादीला किमान ६५ ते ७० जागा मिळाल्या पाहिजेत यासाठी त्यांचे नेते खुप आग्रही आहेत.

…तर १०० उमेदवारांची
यादी आज जाहीर होणार
महायुतीतील अंतिम निर्णय झालेल्या व समोरचा उमेदवार कोणीही आला तरी आपला उमेदवार निश्चित असलेल्या लोकांची उमेदवारी जाहीर करावी, असे ठरले आहे. मंत्री व विद्यमान आमदारांची पहिली यादी तयार आहे. शिंदे सेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच निर्णय अंतिम आहे. राष्ट्रवादीतील प्रमुख मंत्री व आमदार पुन्हा निवडणुकीत उतरणार हे निश्चित आहे त्यामुळे त्यांचीही याला तयारी आहे. भाजपाला मात्र औपचारिकता म्हणून का होईना पण पक्षाच्या केंद्रीय निवड मंडळाची मंजुरी लागणार आहे. ती घेऊन उद्या घोषणा करायची की नाही हे ठरेल, असे सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR