मुंबई : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवरील टाच आयकर विभागाने सैल केली. अजित पवारांची जप्त करण्यात आलेली मालमत्ता आयकर विभागाने परत केली आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
प्राधिकरणाने निष्कर्ष काढला आहे कि, या कंपन्या व त्यातील बेनामी आर्थिक व्यवहारांचा कोणताही फायदा थेट अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना झाला हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा आयकर विभागाने सादर केलेला नाही. तसेच बेनामी संपत्तीसाठी पैसेही सुनेत्रा पवार किंवा अजित पवार यांनी दिले आहेत हे आयकर विभागाने सिद्ध केलेले नाही, असं प्राधिकरणाने म्हटलं आहे. त्यामुळे संपत्ती टाच करण्याचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत, असं प्राधिकरणाने म्हटलं आहे.
निबोध, प्रतुर्ण, अपरिमेय या तीन कंपन्यांमार्फत नरिमन पॉईंट येथील निर्मल बिल्डिंगमध्ये 13 जून 2014 रोजी जागा विकत घेण्यात आली होती. आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत ही जागा ‘बेनामी’ संपत्ती असल्याचे निदर्शनास आले. निबोध, प्रतुर्ण, अपरिमेय या कंपन्या प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय करत नव्हत्या.
निबोध, प्रतुर्ण आणि अपरीमेय या कंपन्यांचे शेअर्स जय ऍग्रोटेक (आता स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाते), कल्पवृक्ष वृक्षारोपण प्रा. लि. या कंपन्यांना ट्रान्सफर करण्यात आले. सगळ्या कंपन्या अजित पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याच नियंत्रणात होत्या, तर मोहन पाटील व नीता पाटील ‘डमी’ असल्याचा आयकर विभागाचा निष्कर्ष आहे.
अमिकोऍग्री, सु-तारा ऍग्रो, एफपी रिऍलिटी (अजित पवार, पार्थ पवार व साहिल प्रधान संचालक आहेत) या कंपन्यांचे नोंदणीकृत पत्ते अनंता मर्क्स (पार्थ पवार पार्टनर) कंपनीचे आहेत त्यातून या सर्व कंपन्या अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी चालवल्या जात असल्याचा निष्कर्ष आयकर विभागाने काढला आहे.