बारामती : प्रतिनिधी
अजित पवार यांनी दिलेल्या धमकीप्रकरणी बारामती कोर्टाने समन्स बजावले आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतरही मासाळवाडी या गावामध्ये अजित पवार गेले होते. त्यावेळी गावातील लोकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करु, अशी थेट धमकी दिली होती.
अजित पवार यांना याप्रकरणी कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी ही माहिती माध्यमांना दिली. २०१४ च्या निवडणुकीत अजित पवारांनी उमेदवाराला मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करू अस वक्तव्य केल्यामुळे कोर्टाने हे समन्स बजावले असल्याचे खोपडे यांनी सांगितले.
२०१४ च्या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजित पवार सुप्रिया सुळे यांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते. प्रचार करत होते. परंतु दहा वर्षानंतर कोर्टात सुनावणीस आलेल्या या प्रकरणात आता बरेच बदल झाले आहेत. आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे विरोधात आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांची बहीण सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली होती. त्यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.