शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
सप्टेंबर २०२४ मध्ये तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता १६ कोटी ५३ लाख ६२ हजार रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला असून याचा तालुक्यातील २५ हजार १८ बाधित शेतक-यांंना लाभ मिळणार आहे. या मदतीने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतक-याांना ऐन सणासुदीच्या दिवसात थोडासा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. या पावसाचा खरीप पिकांना मोठा फटका बसला होता.या अतिवृष्टीमुळे शिरूर अनंतपाळ, साकोळ व हिसामाबाद या तीन ही महसुल मंडळातील हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता.यात २५ हजार १८ पेक्षा अधिक शेतक-यांंच्या शेती पिके बाधित झाले होते. दरम्यान यंदा मान्सूनच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावली पण तालुक्यात ऑगस्टमध्ये काही भागांत अतिवृष्टी झाली होती पण सप्टेंबरमध्ये मात्र तालुक्यातील तीन्ही महसूल मंडळाला पावसाने झोडपले होते. त्यामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला होता. यात सोयाबीनचे अधिक नुकसान झाले होते.या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांतून केली जात होती.अखेर नुकसान झालेल्या शेतक-यांना राज्य सरकारने नुकसान भरपाई वितरण करण्यास मंजुरी दिली असून डिबीटीद्वारे थेट शेतक-यांच्या खात्यात जमा होणार आहेत.
राज्य सरकारने निवडणुकांच्या तोंडावर शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेण्याचा तडाखा लावला आहे. यामध्ये अनुदान वाटप, नुकसान भरपाई वाटप आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधींची तरतूद करण्यात येत आहेत तर यावर्षीच्या ऑगष्ट सप्टेबर महिन्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतक-यांंना मदत देण्याकरिता शासनाने निधी मंजूर केला आहे.