राहुल गांधींनी केली अटकेची मागणी, कामकाज तहकूब
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. तिस-या दिवसाचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झाले. यावेळी विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज काही वेळातच तहकूब करावे लागले. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी यांच्या अटकेची मागणी केली. यावरून विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराच्या तासातच विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. मेरठचे भाजप खासदार अरुण गोविल प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले, तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी खासदारांना सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. विरोधकांनी गदारोळ सुरू ठेवल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. अरुण गोविल यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी संबंधित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले. या दरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना जागेवर बसण्याची सूचना केली. गोविल पहिल्यांदाच प्रश्न विचारत आहेत. सभागृहाचे कामकाज शांततेत चालू द्यावे, असे ते म्हणाले. मात्र, गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे कामकाज तहकूब करावे लागले. उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन अहवालात करण्यात आलेल्या आरोपानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानींच्या अटकेची मागणी केली. अदानींना अटक झालीच पाहिजे, असे ते म्हणाले.
राज्यघटनेवर चर्चेची मागणी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्यघटनेवर दोन दिवस सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. राज्यसभेतही विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही हीच मागणी लावून धरली. दोन्ही सभागृहांत ही मागणी लावून धरण्यात आली.