20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeसंपादकीयअद्भूत अन् चित्तथरारक!

अद्भूत अन् चित्तथरारक!

अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली की त्या गोष्टीचे आश्चर्य वाटणे साहजिक आहे. परंपरागत मार्ग सोडून एखादी घटना घडली की तिचे अपरूप वाटणारच. अर्थात अशी गोष्ट घडण्यामागे अखंड मेहनत, मनोनिग्रह आवश्यक असतो. नियती माणसाची परीक्षा घेत असते. त्याच्यासमोर समस्यांची मालिका उभी करते. या समस्यांचा मुकाबला करत एखाद्याने यशाचा मार्ग शोधला की ते साहस अद्भूत अन् चित्तथरारक वाटते. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर बांगलादेशविरुद्धच्या दुस-या कसोटीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने असाच पराक्रम गाजवला. दीडशे वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात जे घडले नाही ते भारतीय संघाने घडवले. ‘अनहोनी को होनी’ करून दाखवली.

आजच्या धावत्या जगात थांबायला कोणाकडेच वेळ नाही. कसोटी क्रिकेटचा सामना पाच दिवसांचा असतो. दोन्ही संघांचे प्रत्येकी दोन डाव होणे आवश्यक असते. कसोटी सामन्यात फलंदाजांचा आणि गोलंदाजांचा खरा कस लागतो हे खरे आहे. कारण भरपूर वेळ असल्याने खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी असते. परंतु ते पहायला प्रेक्षकांकडे कुठे वेळ आहे? पाच दिवस दररोज साडेपाच ते सहा तास स्टेडियममध्ये बसून राहण्याइतपत वेळ त्यांच्याकडे कुठे आहे? त्यामुळे कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांनी पाठ वळवली तेव्हा क्रिकेट संचालकांना त्यावर मार्ग शोधणे भाग पडले. क्रीडा रसिकांना मनोरंजनासाठी दीड-दोन तासांचा वेळ खर्ची घालणे परवडणारे होते. म्हणून त्यांचा ओढा झटपट निर्णय लागणा-या हॉकी, फुटबॉलसारख्या क्रीडाप्रकारांकडे वाढला.

क्रिकेट चालकांनी ही गोष्ट हेरली आणि क्रिकेट रसिकांना स्टेडियममध्ये खेचण्यासाठी मर्यादित षटकांचे वन डे (एकदिवसीय) क्रिकेट आणले. स्टेडियम पुन्हा तुडुंब भरू लागली. परंतु शंभर षटकांचा खेळ पहायलाही रसिकांना अवघड झाले. कोणत्याही गोष्टीत जास्त काळ रमायचे नाही हा मनुष्य स्वभाव आहे. वन डे क्रिकेट बघायलाही त्याला वेळ मिळेना तेव्हा रसिकांचा ओढा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकी २० षटकांचे टी-२० क्रिकेट पेश करण्यात आले. या क्रिकेट प्रकाराने मात्र सध्या तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. परंतु त्यातही टी-१० क्रिकेटचा प्रकार हळूच डोके वर काढण्याच्या प्रयत्नात आहे. अर्थात अजून तरी या प्रकाराने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेला नाही. आयपीएलने टी-२० प्रकाराचे रसिकांच्या मनावर गारूड केले आहे. ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, न्यूझिलंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्येही आयपीएलच्या धर्तीवर टी-२० क्रिकेट सुरू आहे. परंतु आयपीएलसारखी लोकप्रियता कोणत्याच देशाला मिळवता आलेली नाही. असो.

पाच दिवसांचे कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत एवढे मात्र खरे. कानपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या दुस-या आणि शेवटच्या कसोटीने कसोटी क्रिकेटला ऑक्सिजनचा पुरवठा केला यात शंका नाही. बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका भारताने २-० अशी खिशात टाकली. कसोटीतही टी-२०च्या शैलीत खेळ करता येऊ शकतो हे भारतीय संघाने दाखवून दिले. बांगलादेशचा संघ भारत दौ-यावर आला होता तो पाकिस्तानचा व्हाईटवॉश करून! भारताचाही आम्ही धुव्वा उडवू अशी फुशारकीही त्यांनी मारली होती, परंतु घडले भलतेच! चेन्नईतील पहिल्या कसोटीत भारताने बंगबंधूंना २८० धावांचा मार दिला होता. अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने शतक ठोकले होते आणि गोलंदाजीत ६ बळींचा षटकार ठोकत ‘सामनावीर’चा पुरस्कार पटकावला होता. दीडशे धावांत ६ खेळाडू गारद झाल्यानंतर अश्विन-जडेजा या अष्टपैलू जोडीने भारताला तीनशेपार नेले होते.

कानपूरमधील दुस-या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर बांगलादेशवर ७ गडी राखून मात केली आणि सलग १८वा मालिका विजय मिळवला. तब्बल एक तपापासून घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेत भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. कानपूरमधील विजयाचे महत्त्व वेगळेच आहे. या कसोटीत पावसामुळे अडीच दिवसाचा खेळ वाया गेला होता. पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ शक्य झाला. त्यात बांगलादेशची ३ बाद १०७ अशी स्थिती होती. त्यानंतर दुस-या व तिस-या दिवसाच्या खेळावर पावसाचे पाणी पडले. चौथ्या दिवशी पाऊस गायब झाला आणि भारताने बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांत गुंडाळला. त्यानंतर भारताने टी-२०च्या शैलीत खेळ करत ३४.४ षटकांत ९ बाद २८५ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.इंग्लंडच्या बॅझबॉल शैलीला लाजवेल असा खेळ करताना भारताने सर्वांत जलद ५०, १००, १५०, २०० आणि २५० धावांचे टप्पे पार करत नवे विक्रम प्रस्थापित केले.

षटकामागे ८.२२ धावगती ठेवली होती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते. भारताने बांगलादेशचा दुसरा डाव ४७ षटकांत १४६ धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक असलेल्या ९५ धावा १७.४ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केल्या. भारताने या कसोटीत एकूण ३१२ चेंडू खेळून विजयी लक्ष्य गाठले. भारतीय संघाने आक्रमक खेळ केला. कसोटी क्रिकेट जिवंत ठेवायचे असेल तर अशाच मानसिकतेची गरज असल्याचे भारताने क्रिकेट जगताला दाखवून दिले आहे. भारताने घरगुती क्रिकेटचा गृहपाठ उत्तमरीत्या केला आहे, त्यामागे कित्येक वर्षांची मेहनत आहे. त्यामुळेच भारताची जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेच्या दिशेने तिस-यांदा वाटचाल सुरू आहे. क्रिकेट जगतावर भ्ाांरताने आपला दबदबा ठेवला आहे. हा सारा प्रवास अद्भूत अन् चित्तथरारकच म्हटला पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR