लातूर : प्रतिनिधी
आयआयटी दिल्ली येथे शिक्षण घेत असलेला अभियंता अनिरुद्ध अशोक कुलकर्णी याची कॅम्पस मुलाखतीतून बेंगलोर येथील कंपनीसाठी निवड करण्यात आली आहे. आयआयटी दिल्ली मधून निवड झालेला आणि सर्वाधिक पॅकेज मिळवलेला अभियंता म्हणून अनिरूध्द कुलकर्णी याची ओळख निर्माण झाली आहे. लातूर येथील रहिवासी असलेला आणि सध्या आयआयटी दिल्ली येथे शिक्षण घेत असलेला अनिरुद्ध अशोक कुलकर्णी याची कॅम्पस मुलाखतीमधून बेंगलोर येथील ‘कॉन्टबॉक्स संशोधन केंद्र’ या कंपनीसाठी ‘कोअर अभियांत्रिकी विश्लेषक’ म्हणून निवड झाली आहे. दिनांक ८ जुलै २०२४ पासून तो या कंपनीच्या सेवेत रूजू होईल. सदरील कंपनी ही वित्त क्षेत्रात कार्यरत आहे.
आयआयटी दिल्ली मध्ये आज झालेल्या कॅम्पस मुलाखतीमधून सर्वाधिक ८८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवलेला अभियंता म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. लातूर येथील संपादक अशोक कुलकर्णी यांचा तो मुलगा असून, त्याचे प्राथमिक शिक्षण लातूर शहरातील श्री किशन सोमाणी विद्यालयातून त्याचप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय लातूर, नवोदय विद्यालय कोट्ययम (केरळ) येथून झालेले आहे. जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारांची संख्या वाढत असताना तब्बल ८८ लाख रुपयांचे पॅकेज मिळवणारा अनिरुद्ध अशोक कुलकर्णी याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.