19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसंपादकीयअपघात की घातपात?

अपघात की घातपात?

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्री होसेनी अमीर अब्दुल्लाहियान यांच्यासह ८ जणांना घेऊन जाणा-या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा शोध अखेर बचाव पथकाला लागला. अझरबैजानच्या डोंगराळ भागातील एका खोल दरीत हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर बचाव पथकाला सापडले खरे पण इब्राहिम रईसी यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वांचाच मृत्यू झाला. इराणने अधिकृतरीत्या त्याची पुष्टीही केली आहे. मात्र, रईसी यांच्या ताफ्यातील इतर दोन हेलिकॉप्टर दाट धुके असतानाही सुखरूप इराणमध्ये परततात आणि नेमके रईसी ज्या हेलिकॉप्टरमध्ये होते त्याचाच भीषण अपघात होऊन ते चक्काचूर होते या विचित्र योगायोगामुळे या अपघाताबाबत अपघात की घातपात? अशी कुशंका व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे इस्रायल-हमास संघर्षात इराणचे राष्ट्राध्यक्ष असणा-या रईसी यांनी उघडपणे हमासची बाजू घेऊन इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्यानंतर इस्रायल-इराणमधला तणाव विकोपाला गेलेला असताना हा अपघात घडला आहे.

शिवाय रशिया-युके्रन युद्धातही इराणने रशियाची बाजू घेत रशियाला क्षेपणास्त्र वाहून नेणा-या ड्रोन्सचा पुरवठा केला होता व अमेरिकेची नाराजी ओढवून घेतली होती. या सगळ्या तणावामागे रईसी यांचे अमेरिकाविरोधी आक्रमक धोरण कारणीभूत होते. रईसी यांच्या कट्टरपंथीय इस्लामी धोरणाने देशांतर्गत असंतोष उफाळून आलेला होता. तो एवढ्या टोकाला पोहोचला होता की, अपघातानंतर रईसी, ज्यांना ‘तेहरानचा कसाई’ या नावाने ओळखले जाते, जिवंत सापडू नयेत म्हणून इराणमधील संतप्त नागरिकांनी प्रार्थना केल्या होत्या व त्यांच्या मृत्यूची बातमी आल्यावर इराणमध्ये अनेक ठिकाणी जल्लोषही करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही सगळी परिस्थिती पाहता रईसी यांचा अपघाती मृत्यू हा निव्वळ योगायोग आहे की, घातपात आहे? अशी शंका निश्चितच व्यक्त होते आहे. इराणने अद्याप घातपाताची शक्यता वा शंका व्यक्त केलेली नाही. मात्र, तरीही याबाबत शंकेची सुई इस्रायलकडे वळली आहे.

इस्रायललाही त्याची कल्पना असल्यानेच इस्रायलने ‘आम्ही एक टिपूसही ढाळणार नसलो तरी रईसी यांच्या मृत्यूशी आमचा कसलाही संबंध नाही’, असा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे ज्या अझरबैजानच्या डोंगराळ भागात रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले तो भाग एकवेळ इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादचे वर्चस्व असलेला भाग होता. या भागात वास्तव्य करून इराणची हेरगिरी केल्याच्या आरोपावरून इस्रायलच्या चार नागरिकांना पकडून इराणने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. काही दिवसांपूर्वी इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र व ड्रोन्सद्वारे मोठा हल्ला केला होता. इस्रायलच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेमुळे इस्रायलने हा हल्ला निष्प्रभ केला होता. इस्रायलने या हल्ल्यास तेवढेच जोरदार प्रत्युत्तर न देता या हल्ल्याचा बदला घेतला जाईल अशी प्रतिक्रिया दिली होती. या पार्श्वभूमीवर मोसादचे वर्चस्व राहिलेल्या अझरबैजानच्या दुर्गम व घनदाट जंगलाच्या भागातच रईसी यांच्या हेलिकॉप्टरला झालेला अपघात हा आणखी एक योगायोगच! त्यामुळे इस्रायलने बदला पूर्ण केला का? ही शंका उपस्थित होते. त्यातूनच या अपघाताचा ठपका इस्रायलवर ठेवण्यास सुुरुवात झाली आहे.

रईसी यांच्या कडवट व कट्टरपंथी विचारांची छाप इराणच्या देशांतर्गत व परराष्ट्र धोरणावरही मोठ्या प्रमाणावर होती. त्यातून इराण हा युद्धखोर देश अशी प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र, त्याची फारशी चिंता न करता रईसी यांनी इराणला अण्वस्त्रसज्ज देश बनविण्याची योजना रेटून पूर्ण केली होती. एवढ्यावरच न थांबता इतर किमान दोन मुस्लिम राष्ट्रांना अण्वस्त्रसज्ज बनविण्याची रईसी यांची इच्छा होती. यातून इराणने अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांची नाराजी ओढवून घेतली होती. इराण जागतिक राजकारणात एकटा पडला होता तरी रईसी आपले आक्रमक परराष्ट्र धोरण बदलायला अजिबात तयार नव्हते. देशांतर्गतही त्यांनी इस्लामच्या नावावर महिलांविरोधी धोरण राबविले होते. हिजाबसक्तीच्या विरोधात महसा अमिनीने आंदोलन पुकारल्यावर इराणच्या नैतिक पोलिसांनी तिला अटक केली व अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. तिचा त्यातच पोलिस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलन चिघळले. हजारो महिला रस्त्यावर उतरल्या. मात्र, रईसी यांनी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडून टाकले. रईसी इराणचे अध्यक्ष होण्यापूर्वी प्रमुख न्यायाधीश होते.

तेव्हा त्यांनी बलात्कार झाल्याची फिर्याद करणा-या असंख्य मुलींना देहदंडाची शिक्षा ठोठावली. त्यात चौदा वर्षांच्या असंख्य कोवळ्या मुलींचाही समावेश होता. रईसी यांनी आपल्या कारकीर्दीत किमान ४० हजार जणांना फाशीची शिक्षा दिली. या सगळ्यांना फाशी देण्यासाठी जल्लाद कमी पडू लागले तेव्हा अजस्त्र क्रेनवर लटकवून गुन्हेगारांना जाहीर फाशी देण्याची अत्यंत क्रूर पद्धत रईसी यांनी अवलंबिली होती. रईसी यांना ‘तेहरानचा जल्लाद’ नावाने का ओळखले जाते व त्यांच्या मृत्यूवर इराणमध्ये जल्लोष का होतो? हे समजावून घेण्यासाठी रईसी यांची ही पार्श्वभूमी समजावून घ्यावी लागते. त्यामुळे रईसी व इराणने अमेरिका, इस्रायलसह अनेक देशांचा रोष व शत्रुत्व ओढवून घेतले होते. त्यातूनच गेल्या चार वर्षांत इराणचे सैन्याधिकारी, राजदूत असे अनेक जण संशयास्पदरीत्या मारले गेले आहेत. एकंदर रईसी यांच्या कडवट मुस्लिम धोरणाने इराणअंतर्गत व बाहेरही त्यांच्याबाबत असंतोष खदखदत होता. मात्र, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांचे पट्टशिष्य असल्याने रईसी यांच्या उर्मटपणाला आवर घालणे कोणासही शक्य होत नव्हते. आता अपघातानंतर या अपघातामागे खोमेनी यांच्या मुलाचाच हात असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. खोमेनी यांनी रईसी यांच्या अपघातानंतर दिलेल्या त्रोटक प्रतिक्रियेने व हा अपघातच असल्याचे स्वीकारण्याचे संकेत दिल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे. रईसींचा अतिकडवटपणा व आक्रमकता खोमेनींसाठीही डोकेदुखी ठरल्याने सत्तासंघर्ष व वर्चस्वाच्या लढाईतून हा अपघात घडवला गेला का? अशी शंका त्यातून व्यक्त होते आहे.

अर्थात जगातले सगळे घातपात हे प्रथमदर्शनी अपघात वाटावेत याच खुबीने घडवले जातात. त्यामुळे रईसी यांच्या अपघातावर संशय निर्माण होणे अटळ आहेच. त्यावर कधी प्रकाश पडेल व सत्य बाहेर येईल, हे सांगणे कठीणच! तूर्त हा अपघात की घातपात? यावर चर्चा होत राहणारच! मात्र, रईसी यांच्या मृत्यूमुळे अगोदरच तणावग्रस्त पश्चिम आशियातील तणाव किती वाढणार? याची आता जगाला चिंता आहे. रईसी यांच्या मृत्यूने इराणचे अंतर्गत राजकारणही ढवळून निघणार आहेच. रईसी यांच्या मृत्यूनंतर इराणमधील कट्टरतावाद कमी होणार की आणखी उफाळून येणार? हा ही चिंतेचा विषय आहेच. शिवाय चाबहार बंदर विकासाच्या भारताने इराणसोबत केलेल्या कराराचे भवितव्य काय? हा ही प्रश्न निर्माण झाला आहेच. एकंदर रईसी यांचा अपघाती मृत्यू गूढ वाढवणारा आहे व त्याची उत्तरे येणारा काळच देऊ शकतो, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR