काबूल नदीतून पाकला
जाणारे पाणी रोखणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानची कोंडी केली आहे. भारताने सर्वप्रथम सिंधू नदी जल वाटप करार स्थगित करून पाकची पाणी कोंडी केली. त्यानंतरही चौफेर कोंडी करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आता अफगाणिस्तानातून वाहणा-या काबूल नदीचे पाणीही पाकिस्तानला मिळू नये, यासाठी भारताने डाव टाकला आहे. त्यामुळे भविष्यात अफगाणिस्तानातून येणा-या पाण्याचा ओघ थांबण्याची चिन्हे आहेत.
अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यामध्ये अनेक मुद्यांबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. जयशंकर आणि मुत्ताकी यांनी अफगाणिस्तानात भारताच्या मदतीने सुरू असलेल्या विकास प्रकल्पाचे काम पुढे नेण्यास हमती दर्शविली. यात काबूल नदीवर बांधण्यात येणा-या लालंदरमधील शाहतूत धरण प्रकल्पाचा समावेश आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये हा करार केला होता. या प्रकल्पामुळे काबूल येथे राहणा-या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्याची सोय होईल. या प्रकल्पामुळे काबूल नदीचे पाणी अडवले जाणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तानकडूनही पाकची कोंडी होणार आहे. ही नदी हिंदकुश पर्वतरांगांमधून उगम पावते आणि पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रवेश करते. त्यामुळे हे पाणी रोखल्यास पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो.