बारामती : बारामतीत परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आपण पाहत आहोत. बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
बारामतीकरांनी १५ वर्षे खासदार म्हणून निवडून दिले. मात्र अबकी बार सुनेत्रा ताई पवार. कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
पुण्यात सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, व्यासपीठावरील मान्यवरांची संख्या खूप मोठी आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्यासपीठावर अशी मजबूत माणसं आहेत की, १०-१२ लाख मते अगदी सहज मिळतील, आणि ते बरोबर आहे. हे लोक सुनेत्राताईंना दिल्लीला नक्कीच पाठवतील. आज आपण पाहतोय की बारामतीत परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट आहे. आज ख-या अर्थाने बारामतीकरांनी परिवर्तन करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे बारामतीत परिवर्तन होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अबकी बार सुनेत्राताई पवार
बारामतीकरांनी १५ वर्षे खासदार म्हणून निवडून दिले. मात्र अबकी बार सुनेत्राताई पवार. कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. बारामतीची लढाई ही ऐतिहासिक लढाई असली तरी ही वैयक्तिक लढाई नाही. ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई आहे.
ही देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक
या देशाला विकासाकडे नेणा-या नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवत अजित दादांनी महायुतीची साथ दिली आणि ख-या अर्थाने ही लोकसभेची निवडणूक एका मतदारसंघासाठी मर्यादित नाही. ही देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. बलशाली, मजबूत आणि विकसित भारत बनवणारी निवडणूक आहे. प्रत्येकाचे मत आपल्याला महत्त्वाचे आहे. ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
अजितदादांवर अन्याय झाला
बारामतीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम अजितदादांनी केलं आहे. अजितदादांवर अन्याय झाला आहे. म्हणून ते आमच्यासोबत आलेत. मोदींनी शरद पवारांचे बोट सोडल्यानंतर ख-या अर्थाने देशाचा विकास झाला आहे. सुनेत्रा पवारांचे वक्तृत्व आणि कर्तृत्व चांगले आहे. म्हणून त्या नक्कीच खासदार होणार आहेत. आता देशात फक्त मोदी गॅरंटी चालते.