छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११९ शाळांच्या मुख्याध्यापकांना वारंवार सांगूनही त्यांनी शिक्षक व कर्मचा-यांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर सादर केली नसल्याने सत्तारांवर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
मंत्री तथा शिंदे सेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीमार्फत ३० शाळा चालवण्यात येतात. या शाळांनी निवडणूक कामासाठी आपल्या कर्मचा-यांची यादी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर टाकली नव्हती. हा सर्व प्रकार समोर आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
सिल्लोड शहर आणि ग्रामीण पोलिस ठाण्यात सत्तार यांच्या १७ शाळा तर संभाजीनगर शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संभाजीनगर जिल्हा निवडणूक अधिका-यांनी निवडणुकीच्या कामासाठी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळेच्या व्यवस्थापन, मुख्याध्यापकांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्यातील ११९ पेक्षा अधिक शाळांच्या प्रशासनाने ऑनलाईन माहिती भरण्यास टाळाटाळ केली. याविषयी माहिती जमा करण्यास सुरुवात केल्यानंतर ती संख्या ९० वर पोहोचली आहे.
त्यामुळे माहिती सादर न करणा-या तीन तालुक्यांतील ३६ शाळांच्या मुख्याध्यापकांवर गटशिक्षणाधिका-यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश माध्यमिक व प्राथमिकच्या शिक्षणाधिका-यांनी दिले आहेत.
या शाळांवर कारवाईची नोटीस पाठविल्यानंतर ४२ शाळांनी त्यास उत्तर देत बाजू मांडली. मात्र, उर्वरित शाळांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिका-यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिका-यांना दिले आहे.