लातूर : प्रतिनिधी
येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते विनोद वाकडे यांच्या कन्या अश्लेषा ही ड्रोन पायलट बनली आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी तिचा सत्कार करुन तिचे कौतूक करीत भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कृषीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर वाढविणेकरिता केंद्र व राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहनात्मक अनुदान देत आहे. ड्रोनव्दारे विविध खरिप, रब्बी, फळपिके तसेच भाजीपाला पिकावर किटकनाशकाची फवारणी सुलभरित्या करता येते. मात्र, योग्यरित्या ड्रोन चालवू शकतील, असे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात आज उपलब्ध नाही.
ह्याच गोष्टीचा विचार करुन अश्लेषा विनोद वाकडे हिने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे प्रायोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फत ड्रोन पायलट प्रशिक्षण पुर्ण करुन रिमोट पायलट प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. प्रशिक्षण प्राप्त करुन न थांबता या विद्यार्थ्यांनीने परिसरातील शेतक-यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती मध्ये ड्रोनद्वारे फवारणी करण्यासाठी ड्रोन खरेदी केले आहे. अश्लेषा वाकडे हिच्या या यशाबद्दल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी अश्लेषाचा सत्कार केला तसेच भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विनोद वाकडे व वाकडे कुटूंबिय उपस्थित होते.