ऑस्टिन : वृत्तसंस्था
अमेरिकेत स्थलांतरितांवर सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधातील आंदोलनांनी देश ढवळून निघाला आहे. देशातील १२ राज्यांतील २५ शहरांत निदर्शने सुरू आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी नॅशनल गार्ड सैन्य व मरीन तैनात केल्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी अधिक आक्रमकपणे निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. संचारबंदीनंतर हजारो लोकांची धरपकड करण्यात येत आहे.
सिएटल, ऑस्टिनपासून शिकागो आणि वॉशिंग्टनपर्यंत मोर्चेक-यांनी जोरदार घोषणाबाजी केली. इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट एजन्सीविरुद्ध हातात फलक घेऊन विविध मार्गांवर व कार्यालयांबाहेर वाहतूक रोखून धरली. अनेक ठिकाणी आंदोलन शांततेत होत असताना त्यांना पोलिसांच्या बडग्याचा सामना करावा लागला. काही ठिकाणी आंदोलकांना पांगवण्यासाठी रसायनांचा वापर करण्यात आला. आंदोलक काही दिवसांत यापेक्षा मोठ्या निदर्शनांची योजना आखत असल्याने आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
निदर्शनांनी ढवळून निघालेल्या लॉस एंजिलिसमध्ये मी सैन्य पाठवले म्हणून बरे झाले. अन्यथा लॉस एंजिलिस जळाले असते, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, लाखो फॉलोअर्स असलेला जगातील लोकप्रिय टिकटॉकस्टार खाबी लेने त्याच्या व्हिसाची मुदत संपल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतल्यानंतर अमेरिकेतून निघून गेला.