वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध घेतलेल्या कठोरतेचा परिणाम अमेरिकेत दिसून येत आहे. ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर ११ दिवसांत २५ हजाराहून अधिक अवैध स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये रिपब्लिकन क्षेत्रातील १७०० भारतीयांचा समावेश आहे.
ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात ‘डीईआय’ कार्यक्रम थांबवला. त्यामुळे १ लाख भारतीयांच्या नोक-या धोक्यात आल्या आहेत. अमेरिकेतील एकूण ३२ लाख फेडरल कर्मचा-यांपैकी ८ लाख कर्मचारी ‘डीईआय’ कार्यक्रमांतर्गत काम करतात. त्यापैकी सुमारे १ लाख भारतीय आहेत. यामध्ये अमेरिकेचे नागरिकत्व धारण केलेल्या आणि एच-१बी व्हिसासारख्या वर्क व्हिसावर काम करणा-यांचा समावेश आहे.
ट्रम्प यांना ‘डीईआय’ संपवायचे आहे आणि श्वेतवर्णिय लोकांसाठी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील नोक-यांमध्ये अधिक संधी वाढवायची आहे. अमेरिकेच्या ३५ कोटी लोकसंख्येपैकी २० कोटी लोक श्वेतवर्णिय आहेत. यातील बहुतांश ट्रम्प यांची कोअर व्होट बँक मानली जाते.
ट्रम्प सरकारच्या ताज्या कारवाईत अटकेत असलेल्या अवैध स्थलांतरितांच्या संख्येत भारतीय चौथ्या क्रमांकावर आहेत. मेक्सिकोच्या सर्वाधिक ९,२२६ अवैध स्थलांतरितांना पकडले आहे. दुस-या स्थानावर हैतीचे ७,६०० बेकायदेशीर स्थलांतरित होते, तर तिस-या स्थानावर निकारागुआचे ४,८०० अवैध स्थलांतरित होते. अमेरिकेत ११ दशलक्ष अवैध स्थलांतरित आहेत. सर्वाधिक ४० लाख मेक्सिकन आहेत तर तिस-या क्रमांकावर ७.२५ लाख भारतीय आहेत.